ऋतुजा लटकेंना मंत्रीपदाची ऑफर? लटकेंनी केली भूमिका स्पष्ट

अंधेरी पोटनिवडणुक राज्यभर चर्चेत आली असून आता पुन्हा एकदा यावरून राजकारण रंगले आहे. आमच्याकडुन निवडणूक लढा तरच राजीनामा स्वीकारू, मंत्रीपदही देऊ असे ऋतुजा लटके यांच्यावर दबाव टाकला जात आहे असा गंभीर आरोप देखील ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. मात्र आता पोटनिवडणुकीच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.



लटके म्हणाल्या,

“माझ्यावर कोणताही दबाव नाही. आमची जी निष्ठा आहे ती उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. मी मुख्यमंत्र्यांना भेटली नाही. असंही त्या म्हणाल्या आहेत. मी निवडणूक लढले तर मशाल चिन्हावर लढेल. बाकी कोणत्या चिन्हावर लढणार नाही. माझे पती रमेश लटके यांची आणि माझी निष्ठा ठाकरे साहेब यांच्यावर आहे. मी आजही आयुक्तांना विनंती करून आजच्या आज राजीनामा मिळवा अशी विनंती करणार आहे. निवडणूक लढली तर ती फक्त मशाल या चिन्हवरच लढणार आहे.”

अनिल परब यांचे गंभीर आरोप

पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दाखल होण्यास दोन दिवस उरले असताना त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण ऋतुजा लटके यांनी दिलेला नोकरीचा राजीनामा अद्याप मुंबई महापालिकाने स्वीकारलेला नाही. त्यावर शिवसेना नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत काही गंभीर आरोप केले आहेत.

परब म्हणाले,

“ऋतुजा लटके यांनी 3 ऑक्टोबर राजीनामा दिला आहे. त्यांनी एक महिना आधी नोटीसही दिली होती. ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याची फाईल तयार आहे. मात्र त्यावर मुंबई महापालिका आयुक्तांकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही.”

मात्र हा राजीनामा आयुक्तांकडे जाण्याचा प्रश्नच नाही. कारण त्या लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांचा राजीनामा जॉइंट कमिश्नर लेव्हलला मंजूर होतो. त्यामुळे केवळ फाईल फिरवण्याचा खेळ सुरू आहे, असा आरोप अनिल परब यांनी केला. जाणून बुजून राजीनामा मंजूर करायचे नाही हे सुरू होत आहे. मात्र राजीनामा का स्वीकारला जात नाही याबाबत आयुक्तांकडून लेखी माहिती मागवली आहे, असेही त्यांनी सांगितले.

“ऋतुजा लटके यांना घाबरण्याचे कारण नाही. शिंदे गटाकडूनही त्यांच्या दबाव टाकला जात आहे. आमच्याकडुन निवडणूक लढा तरच राजीनामा स्वीकारू, मंत्रीपदही देऊ असे त्यांना सांगितले जात आहे. पण ते कुटुंब शिवसेनेशी एकनिष्ठ आहे या दबावाला बळी पडणार नाही, असे परब यांनी सांगितले.