एन दिवाळीत पावसाने आणला पूर; धरणांतून मोठा विसर्ग सुरु

दिवाळीच्या तोंडावर नाशकात पुन्हा एकदा पावसाची जोरधार सुरु झाल्यामुळे जिल्ह्यातील काही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून त्यामुळे पुन्हा एकदा गोदावरी नदीला पूर आला आहे. पुन्हा एकदा पाणी पातळी वाढल्याने नदीकाठच्या लोकांचे जीवन विस्कळीत झाले असून त्यांची हाल होत आहे. जिल्ह्यात २ दिवसापासून सकाळी कडक ऊन आणि सायंकाळी मुसळधार सुरु अशी परिस्थिती असून पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे गंगापूर, दारणा आणि पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.


काही काळ विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा जोरदार हजेरी लावत असून यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. पावसामुळे शहरातील खड्ड्यांची अक्षरशः चाळण झाली असतानाच पुन्हा या पावसाचे पाणी त्यात साचून नागरिकांचे हाल होत आहेत. त्यात ग्रामीण भागात या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून त्यांचे उभे पिक झोपून जात आहे. परतीचा पाऊस विध्वंसक असून यात विजा देखील अनेकवेळा पडून अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे.


त्यात आता पुन्हा ३ ते ४ दिवसापासून पाऊस पुन्हा सायंकाळी रोज न चुकता जोरदार हजेरी लावत असल्याने जिल्ह्यातील गंगापूर, दारणा आणि पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यात पालखेड धरणातून 6118, दारणा धरणातून 1100 तर गंगापूर धरणातून 600 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नद्यांना पूर आला आहे.

दिवाळीत पावसाची गर्दी

नागरिक पहिल्यांदा कोरोनानंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करत आहेत. मात्र या दिवाळीत पावसाचे विघ्न आलेय असे म्हणावे लागेल, कारण दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी तुंबड गर्दी असताना जोरदार मुसळधार पाऊस येतो. याने ग्राहकांसाहित व्यापाऱ्यांची देखील तारांबळ उडते. पाऊस आल्याने नागरिक देखील पळापळ सुरु करतात आणि यामुळे बाजारपेठा पूर्ण खाली होऊन अनेकांना आर्थिक फटका बसत आहे.