नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका; रब्बी पिकांचे नुकसान

नाशिक : शहरासह जिल्ह्यातील काही भागात बेमोसमी पावसाने हजेरी लावली. काल सायंकाळच्या सुमारास नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या सरी बरसल्या. नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, गिरणारे इत्यादी ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली. दरम्यान आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी या पावसामुळे अधिकच अडचणीत ढकलला गेला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवस नाशिकला पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. दरम्यान काल जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. काल आलेल्या बेमोसमी पावसामुळे नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाली. तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला आहे. पावसाच्या अवकृपेमुळे रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजप्रमाणे गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्याभरात ढगाळ वातावरण होते. या वातावरणामुळे उष्णतेचा घसरलेला पारा बराच वर आला होत. एरव्ही नाशिक जिल्ह्याला हुडहुडी भरवणारी थंडी खूपच कमी झाली होती. काल दिवसभर हवामानात बदल जाणवत होता. ढगाळ हवामानासह हवेत गारवा जाणवत असल्याने पावसाची शक्यता होती. नैऋत्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ तयार झाल्याने मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

शेतकरी राजावर आस्मानी संकट..

अवकाळी पावसामुळे शेतपिकांवर रोगांचे संकट असते. पिकांवर मोठ्या प्रमाणात विविध रोगांचा परिणाम होतो. परिणामी शेतकर्‍याला वारंवार औषध फवारणी करावी लागते. त्यामुळे अगोदरच मालाच्या कमी भावामुळे आणि त्यावर झालेल्या खर्चामुळे आर्थिक कचाट्यात सापडलेला शेतकरी पुन्हा फवारणीसाठी लागणाऱ्या औषधांचा खर्च आणि एवढं करूनही पीक हाताला येईल याची नसणारी शाश्वती यामुळे अडचणीत ढकलला जातो.

दरम्यान आधीच दोन महिने अतिवृष्टी, सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्या नुकसानीची भरपाई मिळत नाही तोच आता पुन्हा रब्बी पिकांच्या नुकासानीची भर पडण्याची शक्यता आहे. यामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.

तो आला म्हणून ती गेली

नाशिकसह त्र्यंंबकेश्वर, गिरणारे भागात झालेल्या जोरदार पावसामुळे वीजही गायब झाली होती. त्यामुळे शहर अंधारात होते. तर या भागात आधीच पावसाचा फटका बसलेल्या नागरिकांची वीज गेल्यामुळे अधिकच गैरसोय झाली आहे.

नाशिक शहरात नाशिकरोड, सिडको, मखमलाबाद, गंगापूर रोड आदी परिसरात बेमोसमी पावसाने हजारी लावली. त्याचबरोबर जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, गिरणारेसह हरसूल भागात देखील बेमोसमी पावसाचे आगमन झाले. या पावसामुळे काही प्रमाणात थंडीचा कडाका वाढला आहे .