नाशिक मनपावर दोन नव्या उपायुक्तांची नियुक्ती

नाशिक । प्रतिनिधी
राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने मुख्य अधिकारी गट अ व ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या केल्या असून त्यात नाशिक जिल्ह्यातील ओझर नगरपरिषदेवर विद्यमान प्रभारीची पूर्ण वेळ व येवला नगर परिषदेवर नवीन मुख्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय काही अधिकाऱ्यांची नाशिक व मालेगाव महापालिकेवर उपायुक्तपदीही पदस्थापना करण्यात आली आहे.

शासनाच्या नगरविकास विभागाने मुख्याधिकारी गट-ब संवर्गातून मुख्याधिकारी गट अ संवर्गात तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती व पदस्थापना आदेश निर्गमित केले आहेत. त्यात मालेगाव महापालिकेचे आयुक्त राहुल पाटील यांची नाशिकच्या विभागीय आयुक्तालयात सहाय्यक आयुक्त म्हणून प्रशासकीय कारणास्तव रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासन अधिकारी किरण शामराव देशमुख यांच्याकडे ओझर नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्याचा कार्यभार सोपवतानाच त्यांच्याकडे प्रशासकाचा ही कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे.

प्रतीक्षा यादीत असलेले मुख्याधिकारी विजयकुमार मारुतीराव मुंढे यांची नाशिक मनपाच्या उपआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे तर सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय महादेव केदार यांना सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी पदावर कायम ठेवताना त्यांना गट अ च्या कार्यरत पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. नाशिक महापालिकेचे सहाय्यक आयुक्त असलेले दिलीप विश्वनाथ मानकर त्यांची नाशिक महापालिकेच्या उपायुक्त पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. पुणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त सुहास परशुराम जगताप यांची मालेगावच्या उपायुक्त पदी नेमणूक करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज नगर परिषदेचे मुख्याधिकारी नागेंद्र अनंत मुतकेकर यांची येवला नगर परिषदेच्या मुख्य अधिकारीपदी पदोन्नती करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांची मालेगावच्या उपआयुक्त पदावर पदोन्नती झाली आहे.

मुख्याधिकारी गट-ब संवर्गातून मुख्याधिकारी गट अ या संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात या पदोन्नती करण्यात आल्या आहेत. काही अधिकाऱ्यांच्या बदल्या या प्रशासकीय कारणास्तव रिक्त पदावर तर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या या संवर्ग बदलातून पदोन्नतीने झाल्या आहेत. संबंधितांना तत्काळ रुजू होण्याचे आदेश शासनाने काढले आहेत.