नाशिक पोलिसांकडून धाडसी चोरींचा उलगडा; चोरट्यांकडून तब्बल ४५ तोळे सोने हस्तगत

नाशिक: अंबड पोलिसांनी घरफोडी आणि फसवणुक या २ गुन्ह्यातील ४ संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून ४५ तोळे सोने व रोख रक्कम असा २८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. चोरी आणि फसवणूक अश्या दोन गुन्ह्यांमधून या संशयितांनी ही रक्कम जमवली होती. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असताना अंबड पोलीस पथकाने सापळा रचून ह्या संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत.



पहिली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक चिमाजी ठाकरे (४२, महालक्ष्मी नगर,अंबड नाशिक) यांच्या मुलीचा अज्ञान पणाचा गैरफायदा घेत संशयित आकाश संजय शिलावट (नाशिकरोड) याने तिच्याकडून तब्बल साडेबारा तोळे सोन्याचे दागिने घेतले होते. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी संशयित आकाश शिलावट यास सापळा रचून अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून संपूर्ण साडेबारा तोळे सोने देखील हस्तगत केले आहे.

दुसरी घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद गोविंद रायककलाल (६२,रा. तिडके कॉलनी अंबड नाशिक) यांच्या घरात अज्ञात चोरट्याने (१६ ऑगस्ट ) रात्रीच्या दरम्यान दरवाजाचे कुलुप उघडून त्यांच्या घरातील ३२ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी चक्र फिरवत संशयित अक्षय उत्तम जाधव (२६रा. दत्तनगर,अंबड, नाशिक), संदीप सुधाकर अल्हाट (२४,रा. कांबळे वाडी, भिम नगर, सातपुर), बाबासाहेब गौतम पाईकराव (२८, रा. कांबळेवाडी सातपुर, नाशिक), विकास प्रकाश कंकाळ (२१,रा. कांबळेवाडी, सातपूर, नाशिक) यांना अटक केली.

ही सर्व माहिती माहिती उपायुक्त विजय खरात यांनी पत्रकार परिषदेचे प्रसंगी दिली.