नाशिक शिवसेना संपर्क प्रमुख ॲक्शन मोडमध्ये; निवडणुकांच्या तोंडावर मैदानात

नाशिक: सध्या राज्याच्या राजकारणत मोठ्या प्रमाणावर उलथा पालथ होत असून, आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष आपल्या ताकदीनिशी निवडणुकांत उतरण्याची तयरी करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीत शिवसेनेला आणखी मजबूत बनवण्यासाठी नाशिक शिवसेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी आज नाशिक दौऱ्यावर येत असून त्यांचा हा दौरा विशेष मानला जात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून ते निवडणुकांच्या बाबतीत काय सूचना देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.


संपर्क प्रमुख ॲक्शन मोड मध्ये

खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहे. शिवसेनेची नाशिकची जबाबदारी त्यांचावर असते. मात्र सध्या ते अटकेत असून नाशिकमध्ये शिवसेना कमकुवत होऊ नये त्यामुळे नाशिक शिवसेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी कमालीचे ॲक्शन मोडमध्ये आहेत. जिल्ह्यात १ खासदार आणि २ आमदारांनी बंड केले त्यामुळे शिवसेनेला जिल्ह्यात मोठा धक्का बसलेला आहे. तो भरून काढण्यासाठी तसेच नाशिक महापालिका जिंकण्यासाठी शिवसेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी हे काम करत आहेत.

संजय राऊत यांच्या अत्यंत जवळचे

भाऊसाहेब चौधरी हे संजय राऊत यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात, संजय राऊत यांच्या अटकेनंतर संपर्क प्रमुख पहिल्यांदाच ॲक्शन मोडमध्ये असून जिल्हा आणि शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकामध्ये भाऊसाहेब चौधरी काय सूचना, आदेश देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. राऊत यांच्या अनुपस्थितीत आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाऊसाहेब चौधरी मैदनात उतरले असून ते यंदा शिवसेनेसाठी संकट मोचक ठरणार का यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

संजय राऊतांचे सध्या काय सुरु आहे?

गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. या घोटाळय़ाप्रकरणी ४ ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी झाली होती. त्या वेळी त्यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. ही मुदत संपुष्टात आल्यानंतर न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) २००२ नुसार राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर संजय राऊत यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली होती. यानंतर न्यायालयीन कोठडीच ५ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. मात्र आता त्यांचा अडचणी वाढतानाच दिसत आहेत, त्यांना बेल भेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र त्यांना पुन्हा जेल झाली आहे.