महंत गोविंदानंद यांच्यावर ‘माईक’ उगारणाऱ्या महंतांचा सत्कार..

चैतन्य गायकवाड |

अंजनेरी : गेल्या काही दिवसांपासून रामभक्त हनुमानाचे जन्मस्थळ (Hanuman birthplace) नेमके कोणते हा मुद्दा चर्चेत आहे. हनुमानाचे जन्मस्थान कर्नाटकातील (Karnataka) किष्किंधा (Kishkindha) आहे की नाशिकमधील (Nashik) अंजनेरी (Anjaneri) आहे, यावर शास्त्रोक्त चर्चा करण्यासाठी कर्नाटकातील किष्किंधा मठाचे मठाधिपती महंत गोविंददास (Mahant Govinddas) आणि नाशिक मधील साधू-महंत यांच्यात दि. ३१ मे रोजी बैठक झाली होती.

दरम्यान ही बैठक चर्चा कमी आणि वादानेच (dispute) जास्त गाजली. या बैठकीत सुरुवातीलाच आसनावर बसण्याच्या मुद्द्यावरून नाशिकचे साधू-महंत आणि किष्किंधाचे मठाधिपती स्वामी गोविंदानंद यांच्यात खडाजंगी झाली. हा वाद मिटल्यावर चर्चेस सुरुवात झाली. मात्र, काही वेळातच पुन्हा जन्मस्थळावरून वाद इतका पेटला की नाशिकच्या काळाराम मंदिराचे (Kalaram Temple) महंत सुधीरदास (Mahant Sudhirdas) यांनी थेट स्वामी गोविंदानंद यांच्यावर ‘बूम’ (बाइट घेण्यासाठी असलेला वृत्तवाहिन्यांचा माईक) उगारला. यानंतर स्वामी गोविंदानंद सरस्वती सुध्दा धावून गेले. मूळ हनुमान जन्मस्थळ मुद्दा राहिला बाजूला आणि चर्चेसाठी जमलेली साधू-महंत थेट भांडायला लागले. शेवटी वाद विकोपाला गेल्याने पोलिसांनी (Police) मध्यस्थी करत बैठक थांबवली.

दरम्यान, आज अंजनेरी गावात साधू-महंत आणि ग्रामस्थांची बैठक पार पडली. नाशिकच्या साधू-महंतांनी आक्रमकपणे अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याची बाजू मांडली. त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. स्वामी गोविंदानंद यांच्यावर ‘माईक’ उगारणाऱ्या महंत सुधीरदास पुजारी यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.

दरम्यान, साधू-महंत आणि ग्रामस्थांच्या या बैठकीत अंजनेरी हेच हनुमान जनस्थळ घोषित करण्याबाबत थेट पंतप्रधान (Prime minister) आणि मुख्यमंत्री (Chief minister) यांच्यापर्यंत पाठपुरावा करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, हनुमान जन्मस्थळाबाबत शास्र्तार्थ करण्यासाठी जमलेल्या साधू-महंत यांच्यात वाद झाल्याने कोणत्याही ठोस निर्णयाअभावी बैठक थांबविण्यात आली. त्यानंतर किष्किंधा मठाचे मठाधिपती स्वामी गोविंदानंद यांनी काल पत्रकार परिषद (press conference) घेऊन आपली बाजू माडली. त्यात त्यांनी नाशिकच्या साधू-महंत यांच्याकडे अंजनेरी हेच हनुमान जन्मस्थळ आहे, याचे प्रबळ पुरावे नसल्याचा दावा केला. अंजनेरी हे हनुमान जन्मस्थळ नसल्याच्या मुद्द्यावर आपण ठाम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

मात्र, हनुमान जन्मस्थळाचा वाद कायम असून, या मुद्द्यावर पुन्हा वाद उफाळण्याची शक्यता आहे. स्वामी गोविंदानंद सरस्वती हे गुजरातकडे (Gujrat) रवाना झाले आहे. नाशिक पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या अनुयायांना पोलिस बंदोबस्तात गुजरातकडे रवाना केले.