नाशिककरांना नळजोडणीसाठी भरावे लागणार अतिरिक्त शुल्क!

नाशिक: गेल्या आठ ते दहा वर्षांपासून नगरपालिकेने पाणीपुरवठा संदर्भातील करामध्ये वाढ झाली नसण्याचे कारण देत पाच ते सहापट करण्यात आलेली करवाढ या पूढे कायम ठेवण्यात आली आहे.

त्यामुळे पुढील आर्थिक वर्षांपासून म्हणजेच १ एप्रिल २०२३ पासून नाशिककरांना नळजोडणी संदर्भात अतिरिक्त शुल्क अदा करावे लागणार आहे. पंधराव्या वित्त आयोगासाठीचे अनुदान प्राप्त करायचे असेल तर महापालिकांनी स्वउत्पन्नात वीस ते पंचवीस टक्के वाढ करावी, अशा सूचना घेण्यात आल्या आहेत.

त्याअनुषंगाने महापालिका प्रशासनाने उत्पन्नाचे नवीन मार्ग सुचविताना करवाढीचे धोरण अवलंबिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आठ ते दहा वर्षांपासून नळजोडणी संदर्भातील शुल्कात वाढ केली नसल्याचे कारण देत पाच ते सहापट वाढ करण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला होता.

स्थायी समिती नंतर महासभेतदेखील तो निर्णय कायम ठेवण्यात आल्याने पुढच्या आर्थिक वर्षांपासून नाशिककरांना नवीन करवाढीला सामोरे जावे लागणार आहे. झोपडपट्टीधारकांना ग्रुप पद्धतीने नळजोडणी दिली जाणार आहे.

घरगुती नळजोडणी शुल्काच्या ५० टक्के रक्कम झोपडपट्टी धारकांकडून घेतली जाणार आहे. सोसायटीमध्ये नळजोडणी देताना तळमजल्यावर स्वतंत्र टाकी, सोसायटीचा ना हरकत दाखला बंधनकारक करण्यात आला आहे. सोसायटीसाठी नळजोडणी घेताना मोटार लावणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

असे आहेत नवीन दर:

नळजोडणीसाठी फेरुल जोडणी शुल्क ५० रुपयांवरून २५० रुपये राहील. एक इंच नळ जोडणीसाठी आता पाचशे रुपये आकारले जाणार आहे. घरगुती अर्धा इंची नळजोडणी ५०० रुपये, तर एक इंची घरगुती नळजोडणीसाठी आठशे रुपये अनामत रक्कम भरावी लागेल.

एक इंची फेर नळजोडणी शुल्कापोटी पाचशे रुपये द्यावे लागेल. बिगर घरगुती नळजोडणीसाठी फेरुल जोडणी शुल्क दहापट आहे. अनामत रकमेत पाचपट, फेर जोडणी शुल्कात चारपट वाढ आहे. व्यावसायिक बांधकामासाठी फेरुल जोडणी शुल्क पंधरापट राहील.

अर्धा इंची नळजोडणीसाठी साडेसातशे रुपये दर राहील. एक इंच व्यावसायिक नळजोडणीसाठी दीड हजार, तर व्यावसायिक बांधकामासाठी अर्धा इंचीकरिता अनामत रक्कम दोन हजार रुपये राहील. एक इंची नळजोडणीसाठी दहा हजार रुपये अनामत रक्कम द्यावी लागेल.

प्लंबिंग लायसन शुल्कासाठी एक हजार रुपये फी द्यावी लागेल. परवाना फी तीन हजार रुपये, नूतनीकरणासाठी एक हजार रुपये, टँकर द्वारे पाणीपुरवठ्यासाठी दुप्पट मोबदला द्यावा लागेल.