लाच प्रकरणात नाशिक राज्यात २ नंबर; वर्षभरात १२५ कारवाया

नाशिक : चालू वर्ष ‘२०२२’ हे साल संपण्यासाठी अवघा एक दिवस बाकी आहे. या वर्षात अनेक लहान मोठ्या घडामोडी घडल्या आणि अनेक लाचखोरीची प्रकरणं देखील समोर आली. नाशिक मध्ये देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडाकेबाज कारवाई करत अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडलं. वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या सर्व कारवायांचा आकडा समोर आला आहे. लाचलुचपत विभागाने १२५ वर्षभरात कारवाया केल्या आहे आणि विशेष बाब म्हणजे यामध्ये नाशिकचा दुसरा क्रमाक लागतो.

लाचलुचपत विभागाने नाशिक परिक्षेत्रात २०२२ (१ जानेवारी २०२२ ते ३० डिसेंबर २०२२ दरम्यान) या संपूर्ण वर्षात १२५ यशस्वी सापळा कारवाया केल्या आहे आणि चार अन्य भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल केले आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधात होणाऱ्या कारवायांमध्ये नाशिकच्या दुसरा क्रमांक लागतो. गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या कारवायांकडे बघता ते स्पष्टच होत आहे.

कोणत्या विभागात किती कारवाया

नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नाशिकमध्ये पोलीस विभागात ३०, महसूल विभागात २१, जिल्हा परिषद/पंचायत समितीमध्ये १५, म.रा.वि.वि.क मध्ये १०, शिक्षण विभागात ४, आदिवासी विकास विभागात ४ आणि खाजगी व्यक्ती ९ अशा कारवाया करण्यात आल्या आहेत. नाशिक मध्ये एकूण १२५ कारवाया सापळा रचून केलेल्या असून या कारवायांमध्ये १७५ भ्रष्ट अधिकारी गुंतलेले आहेत. यात सर्व कारवायांमध्ये वर्ग १ चे १० अधिकारी, वर्ग २ चे २५, वर्ग ३ चे ९२, वर्ग ४ चे १०, शासकीय अधिकारी कर्मचारी आणि इतर लोकसेवक किंवा खाजगी व्यक्ती ३८ आहेत. तसेच अन्य भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल केले असून १४ शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

घेणारा-देणारा दोघेही दोषी

लाच देणे आणि घेणे हा कायद्याने गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. या गुन्ह्याविरुद्ध लाचलुचपत विभाग कारवाई करत असतो. शासकीय लोकसेवक त्याचे काम कायदेशीरपणे प्रामाणिक रित्या करत असेल आणि ते काम बेकायदेशीर रित्या करून घेण्यासाठी कोणी त्याला लाच देण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा तो पण एक अपराधच आहे. ज्याप्रकारे लाच घेण्यासंदर्भात किंवा मागण्या संदर्भात एखाद्या अधिकारी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होतो त्याच प्रकारे लाच देण्यासंबंधी एखाद्या इसमाविरुद्ध लाच देण्याचा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे ज्या प्रकारे लाच घेणारा दोषी असतो त्याच प्रकारे लाच देणारही तेवढाच दोषी असतो. लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे. त्यामुळे ‘कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कायदेशीर कामकाज करून देण्यासाठी कोणी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणीही लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवावे आणि तक्रार नोंदवावी’ असे आवाहन लाचलुचपत विभागाकडून नागरिकांना वारंवार करण्यात येते.