स्वतःसाठी नाही पण शेतकरी, दिव्यांगांसाठी नाराज झाल्याशिवाय राहणार नाही; बच्चू कडू

राज्यात सरकार स्थापन होऊन महिना उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार होत नव्हता, मात्र आज मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पडला असून पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजप मिळून एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र या मंत्रिमंडळात एकाही अपक्ष किंवा मित्र पक्षाला स्थान न दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. यावर आता आमदार बच्चू कडू यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

बच्चू कडू म्हणाले की, “पहिल्या टप्प्यातील विस्तारामध्ये अपक्ष आणि मित्रपक्षांना स्थान द्यायला हवे होते. खरंतर अपक्ष आणि मित्रपक्षांनी मिळून हे सरकार बनले आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की महिनाभरात जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, तेव्हा अपक्ष आणि मित्रपक्षाचा नक्की विचार केला जाईल. काही अडचणींमुळे या टप्प्यात विचार केला नसेल. मात्र महिनाभरात काय होते बघू असेही ते म्हणाले. मी स्वत:साठी कधीच नाराज होणार नाही. पण दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी नाराज झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला सांगितले आहे की, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुढचा मंत्रीमंडळ विस्तार होईल. तेव्हा तुम्हाला संधी देऊ”, असे कडू यांनी सांगितले आहे.

तसेच आज मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेलाला मंत्रिमंडळ पद मिळाले नाहीये. त्यावर सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. त्या म्हणाल्या, देशाच्या प्रगतीसाठी महिला सक्षमीकरण आवश्यक आहे, असे मोदीजी म्हणतात. त्यासाठी त्यांनी नुसती ‘होम मेकर’ न राहता ‘राष्ट्रनिर्मात्या’ बनली पाहिजे. पण आज मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभात राज्यात 18 मंत्र्यांनी शपथ घेतली मात्र त्यात महिलांना प्रतिनिधित्व नाही, महिलांना मंत्रिमंडळात योग्य प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा होती मात्र एकाही महिलेला संधी मिळाली नाही हे अत्यंत खेदजनक असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.