मोहपाडा आश्रमशाळेत आदिवासी दिन व क्रांती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

सुरगाणा : तालुक्यातील मोहपाडा येथील अनुदानित आश्रमशाळेत आज(दि.९ ) रोजी ‘स्वातंत्र्याचा अमृत’ महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सवाच्या निमित्ताने जागतिक आदिवासी दिन व क्रांतिदिन साजरा करताना विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य शांताबाई पवार ह्या तर प्रमुख पाहुणे सरपंच नरेंद्र दळवी, तसेच पोलीस पाटील पोपट जाधव, सेवानिवृत्त शिक्षक काशीनाथ जाधव हे उपस्थित होते.

दरम्यान, सुरुवातीला मोहपाडा गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, आदिवासी दिनाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. यानंतर आदिवासी क्रांतिकारक जननायक वीर बिरसा मुंडा, तंट्या मामा, राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष गवळी यांनी केले. त्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी अनुक्रमे महेंद्र बागुल, हेमंत बागुल , फुली महाले, वैशाली गायकवाड व एकलव्य रेसिडेंशियल स्कुलमध्ये निवड झालेले रोशन बागुल , विजय कामडी, चेतन पवार या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. दर्शना कामडी, मानसी गांगोडे, वैभव दळवी, भाग्यश्री गायकवाड आदी विद्यार्थ्यांनी आदिवासी क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित भाषणे केली.

त्यानंतर आदिवासी समूहगीत गायन व आदिवासी वेशभूषेसह समूहनृत्य सादर करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थ व पालकांनी सादरीकरणसाठी टाळ्यांची व बक्षिसांची साथ देत कार्यक्रमाची रंगत वाढविली तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. याप्रसंगी वीर बिरसा मुंडा, तंट्या मामा, राघोजी भांगरे या आदिवासी क्रांतिकारकांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुभाष दळवी व संतोष गौळी यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश बुवा, दीपक अहिरे, सुनील कासार, जितेंद्र ठोके, सतीश शेळके,नामदेव वाजे, कैलास चौधरी, मुकेश दोंदे, नवनाथ ठाकरे, जयवंती जाधव, शैला हिरे, अधीक्षक हेमंत ठाकरे, कल्पना भोये, भूषण शिंदे, कैलास गांगोडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन दीपक अहिरे यांनी केले. याप्रसंगी जेष्ठ नागरिक अमृता पवार, किसन कामडी, काशिनाथ जाधव, माजी सरपंच नरेंद्र दळवी, पोलीस पाटील पोपट जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भागवत दळवी, सदस्य योगेश ठाकरे, निवृत्ती कामडी, मोहन पवार आदींसह पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.