अन्यथा, निर्बंधांना न जुमानता क्लासेस सुरूच ठेवू

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकच्या खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेने शासनाच्या निर्बंधांना विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात ज्याप्रमाणे ब्युटीपार्लर आणि जिम अर्ध्या क्षमतेने खुल्या केल्या आहेत, त्याप्रमाणे कोचिंग क्लासेस देखील परवानगी देण्याची मागणी खाजगी क्लासेस संघटनांनी केली आहे.

राज्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये ब्युटीपार्लर आणि जिम पूर्णतः बंद करण्यात आल्या होत्या. मात्र दुसऱ्याच दिवशी हे निर्बंध शिथिल केले. त्यानंतर या दोन्ही आस्थापना ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात आले.

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील खाजगी क्लासेस संघटनांनी या विरोधात आवाज उठवला आहे. त्यांच्यामते ब्युटीपार्लर आणि जिम याप्रमाणे आम्ही देखील नियमांचं पालन करून कोचिंग क्लासेस सुरू करू शकतो. त्यामुळे शासनाने आम्हाला देखील ५० टक्के उपस्थितीत कोचिंग क्लास सरू करण्यास परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, सरकारने आमची ही मागणी मान्य करावी, अन्यथा आम्ही शासनाच्या निर्बंधांना न जुमानता आमचे क्लासेस सुरूच ठेवू असा इशारा नाशिक मधील खाजगी कोचिंग क्लास संघटनांनी दिला आहे.