नाशकात गुलाबी थंडीची चाहूल! तापमानात कमालीची झाली घट

नाशिक: जिल्ह्यात आता गुलाबी थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली असून तापमानात घट दिसून आली आहे. परतीचा पावसाने म्हणजेच मान्सूनने रविवारी, २३ ऑक्टोबरला संपूर्ण देशाचा निरोप घेतला असून पाऊस गेल्यानंतर लगेचच गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये 14.2 तर निफाड मध्ये 12.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून आता नाशकात थंडीने हुडहुडी भरायला सुरुवात झाली आहे.


थंडीचा अंदाज

दिवाळीमधील गारठ्याची पहाट यंदा अनुभवायला मिळणार नसली तरी किमान दोन दिवस किमान तापमान फारसे चढणार नाही, असा अंदाज आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील किमान तापमानावर परिणाम केल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. मुंबईमध्ये पुढील दोन दिवस २० ते २२ अंशांदरम्यान किमान तापमान राहील तर सोमवारी कदाचित कमाल तापमानातही किंचित घसरण होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला.

मान्सून गेला माघारी

गेल्या आठवडाभर परतीच्या पावसाने मध्य महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल्याने आता त्याने निरोप घ्यावा, अशी प्रार्थना सुरू होती. पावसाळा संपल्यानंतर परतीच्या पावसाने प्रवास सुरू केला. २० सप्टेंबरला मान्सून भारतातून माघारी फिरल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र त्यानंतर २९ सप्टेंबरपर्यंत पावसाची परतीची रेषा स्थिर होती. महाराष्ट्राच्या वेशीपर्यंत आलेला परतीचा पाऊस वातावरणीय स्थितीमुळे बहुतांश भागात खोळंबला होता आणि तब्बल एक महिन्याहून अधिक काळानंतर रविवारी, २३ ऑक्टोबरला मुंबई, कोकण विभाग, पुणे, मध्य महाराष्ट्र यांच्यासह उर्वरित भागातून पाऊस माघारी फिरला. गेल्यावर्षीही १४ ऑक्टोबरपासून तर त्याच्या आदल्या वर्षी २६ ऑक्टोबरपासून राज्यातून पावसाने माघार घेण्यास सुरुवात केली होती. संपूर्ण देशातून गेल्यावर्षी २५ ऑक्टोबरला नैऋत्य मौसमी पाऊस परत फिरला होता.