दादा भुसेंच्या घरासमोर राजू शेट्टी करणार आंदोलन

नाशिक : १६ जानेवारीच्या नाशिक जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर आंदोलन होणार आहे. त्या बिऱ्हाड आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी देखील सहभागी होणार आहे. आपण स्वतः या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती स्वतः राजू शेट्टी यांनी दिली आहे.

नाशिक जिल्हा बँकेच्या वसूली विरोधात १६ जानेवारी रोजी मोर्चा निघणार आहे. दरम्यान यामध्ये आता राजू शेट्टी यांनी सहभागी होण्याची माहिती दिली आहे. त्यासोबतच मोर्चात सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. केवळ सहभागी व्हायचं म्हणून होऊ नका तर जोपर्यंत या विषयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार करा असे आवाहन त्यांनी केले आहे.

थोडक्यात माहिती

  • पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर होणाऱ्या बिऱ्हाड आंदोलनात राजू शेट्टी होणार सहभागी
  • नाशिक जिल्हा बँकेच्या वसूली विरोधात १६ जानेवारी रोजी होणार मोर्चा
  • मोर्चात सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
  • जोपर्यंत या विषयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार करा – राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

नाशिक जिल्हा बँक च्या वसुली विरोधात जिल्ह्यातील शेतकरी एकवटले आहेत. येत्या १६ जानेवारीला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानावर शेतकऱ्यांकडून बिऱ्हाड मोर्चा काढत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून आता या आंदोलनात राजू शेट्टी देखील हजेरी लावणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे.

जिल्ह्यातील ६२ हजार शेतकरी जिल्हा बँकेचे थकबाकीदार आहेत. थकीत कर्जाची मुद्दल फेड करून घ्यावी, कर्जाचे पुनःगर्ठन करत गेल्याने शेतकऱ्यांची थकबाकी वाढत गेली आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी सरकारने अंदाजे ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी या मागण्यांसाठी शेतकरी बिऱ्हाड आंदोलनाच्या माध्यमातून एकत्र येणार आहे.

जिल्हा बँकेकडून कर्ज घेतलेल्या कर्जाची जुलमी वसुली सुरू करण्यात येत आहे. वाहनांचा लिलाव, जमिनीवर बोजे लावण्याचे काम सुरू केले आहे. वसुलीदरम्यान दादागिरीचे प्रकार वाढले आहेत. जिल्हा बँकेकडून घेतलेल्या सर्वांना समान वागणूक देणे गरजेचे आहे. मोठ्या थकबाकीदारांबाबत काय कारवाई केली?असे आरोप करत, प्रश्न विचारात या विरोधात १६ जानेवारीला आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर आता या आंदोलनात राजू शेट्टी देखील हजर राहणार आहे.