राजू शेट्टींचा सरकारला इशारा! शेतकऱ्यांचा प्रश्नांवर लक्ष द्या अन्यथा..

केंद्र व राज्य सरकारने शेतकरी प्रश्नांवर ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा येत्या अधिवेशनामध्ये विधानसभेला धडक दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे. आज कोल्हापुरच्या शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील हायवेवरील चेकनाक्यावर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी राजू शेट्टी बोलत होते.

सरकार आणि विरोधी पक्ष दोन्हीही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीयेत, शेतकऱ्यांना अनेक प्रश्न भेडसावत असून त्यांच्या अनेक मागण्यांसाठी राजू शेट्टी यांनी आज एल्गार पुकारत राज्यभर चक्काजाम आंदोलन केले.

यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रात सध्या राजकीय धुळवड सुरू आहे. यात शेतकर्‍यांचे प्रश्न बाजूला राहिले आहे. जे सत्तेत आहेत ते मजेत आहेत. जे विरोधात आहेत ते शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांनी जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे. अडचणीत असलेल्या शेतकर्‍याला तुटपूंजी मदत जाहीर केली आणि तीही वेळेवर मिळत नाही. पीक विमा कंपन्या मालामाल झाल्या. हजारो कोटींचा नफा मिळवला आणि ज्या शेतकर्‍यांनी विम्याचे पैसे भरले आहेत त्यांना मात्र उन्हातान्हात उभं राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पंतप्रधान पीक विमा योजना शेतकर्‍यांसाठी आहे की कार्पोरेट कंपन्यांना डल्ला मारण्यासाठी आहेत? असा सवाल शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, एकनाथ शिंदे सरकार सत्तेवर आले आणि महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य अशी घोषणा केली. परंतु शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाहीत. असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

ते म्हणाले, सध्या उन्हाळा सुरुवात झाली आहे. विहिरीत व बोरमध्ये पाणी आहे मात्र विजेची कनेक्शन तोडणी जात असल्याने पीके वाळत आहेत. धरणात तयार होणार्‍या विजेवर शेतकर्‍यांचे हक्क आहे मग शेतकर्‍यांना दिवसा वीज का दिली जात नाही. शेतकरी 15 टक्के वीज वापरत असून 30 टक्के वीज वापरत असल्याचे खोटे रेकॉर्ड दाखवले जात असून शेतकर्‍यांना फसवले जात असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे. यावेळी अनेकांनी सहभाग घेत आंदोलन केले आहे.