वाचा दसऱ्याला आपट्याची पाने वाटण्याचे पौराणिक, धार्मिक आणि वैज्ञानिक कारण

दसऱ्याच्या दिवशी आपण आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, आप्तीष्ठांना सोनं म्हणून आपट्याचं पान वाटतो. मात्र ह्या आपट्याच्या पान वाटण्यामागची प्रथा काय? तिचा ऐतिहासिक आणि पौराणिक, वैज्ञानिक संदर्भ काय ते आपण पाहूयात..

आपट्याचं पान वाटण्यामगे धार्मिक, वैज्ञानिक आणि ऐतिहासिक असे तीनही कारण आहेत.

आपट्याच्या पानाचे धार्मिक महत्त्व

अश्मन्तक महावृक्ष महादोष निवारण |
इष्टानां दर्शनं देही कुरु शत्रुविनाशनम् ||

अर्थ: आपट्याचा वृक्ष हा महावृक्ष असून तो महादोषांचे निवारण करतो.इष्ट(देवतेचे) दर्शन घडवितो व शत्रूंचा विनाश करतो.

हा वृक्ष शततारका नक्षत्राचा आणि कुंभ राशीचा आराध्यवृक्ष मानला गेला आहे.

आपट्याच्या पानांची पौराणिक कथा :

आपट्याच्या पानांची कथा आहे. वरतंतू गुरू आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञान करत होते. एके दिवशी वरतंतू गुरुने त्याच्या कौत्स नावाच्या विद्यार्थ्याकडे गुरुदक्षिणेचा आग्रह धरला आणि गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी कौत्सकडे १४ विद्या शिकवण्याच्या बदल्यात १४ कोटी सुवर्ण मुद्रा मागितल्या. हे धन कमवणं सहज नव्हतं. म्हणून कौत्सव रघुराजाकडे गेला. त्याने त्या राजाला १४ कोटी सुवर्ण मोहरा मागितल्या. मात्र राजाने त्याची सर्व संपत्ती दान केली होती. त्यामुळे रघुराजाने कौत्सला तीन दिवसानंतर येण्यास सांगितलं. त्यानंतर रघुराजाने कुबेराकडे निरोप पाठवला. धन आल्यानंतर तो युद्धाची तयारी करेल असं राजाला वाटलं. ही बातमी इंद्राला कळाली इंद्राने रघुराजाच्या नगरीच्या वेशीवर आपट्याच्या झाडावर सुवर्ण मुद्रांचा वर्षाव केला. दुसऱ्या दिवशी सुवर्ण राजाने या मुद्रांचा ढिग पहिला. त्याने कौत्साला हवं तेवढं धन घेऊन जा असं म्हटलं. मात्र कौत्साने गुरुदक्षिणा देता येईल तेवढेच धन घेतले आणि बाकी मुद्रा राजाने प्रजेला वाटल्या. राजाने सुवर्ण मुद्रा आपट्याच्या झाडाखाली वाटल्यामुळे दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पानं वाटण्याची परंपरा आहे असं पौराणिक कथांमध्ये सांगितलं जातं.

आपट्याच्या पानाचे वैज्ञानिक महत्त्व :

आपट्याला संस्कृतमध्ये अश्मंतक म्हटलं जातं, श्वेत कांचन आणि युग्मपत्र अशा नावानंही हे झाड ओळखलं जातं. हिंदीमध्ये कठमूली, सोनपत्ती तर कोंकणीत आप्टो अशी या झाडाची वेगवेळी नावं आहेत. या झाडावर अनेक कीटक, फुलपाखरं उपजीविका करतात त्यामुळं पर्यावरणीयदृष्ट्या हे झाड अतिशय महत्त्वाचं आहे. त्याशिवाय मानवासाठीही ते उपयुक्त झाड आहे. या झाडापासून डिंग, धागे, टॅनिन मिळतं. आपट्याच्या लाकडाचाही पूर्वी वापर होत असे तसंच पानांचा बिडी बनवण्यासाठीही वापर केला जातो. आयुर्वेदातही आपट्याचा उल्लेख आहे. आपट्याच्या सालीचा रस पचनसंस्थेच्या रोगांवर वापरला जायचा, मुतखडा विकारात औषधामध्ये आपट्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. तर याची पानं कफ आणि पित्त दोषांवर गुणकारी असल्याचं सांगितलं जातं.