२० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंदवर शिक्षणमंत्री म्हणाले…

कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील २० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार असल्याच्या चर्चा होत असून याबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच शिक्षण विभागाच्या या धोरणाला पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शिक्षक आणि पालकांकडून विरोध होत आहे. मात्र यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मोठे विधान केले असून त्यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला आहे.


२० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार का या प्रश्नावर शालेय शिक्षण मंत्री केसरकर म्हणाले, “राज्यातील २० किंवा त्याहून कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही”, असे विधान त्यांनी केले आहे.

या केवळ अफवा असून अफवा पसरवणाऱ्यांच्या तळाशी जाऊन त्यांच्यावरती प्रसंगी कारवाई करू, असा इशारा देखील दीपक केसरकर यांनी दिला आहे. या निर्णयामुळे शिक्षकांच्या नोकऱ्या जातील अशीही अफवा पसरली जात आहे. मात्र, शिक्षकांना सर्विस ऍक्ट नुसार प्रोटेक्शन असते. त्यामुळे अशी कोणतेही घटना घडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.


ग्रामीण भागातील पालक आणि शिक्षकांचा आहे विरोध

२०१७ साली राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना ० ते २० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या राज्यातील ३३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुद्धा अशाच प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावेळी मात्र, ग्रामीण भागातील शिक्षक आणि पालकांनी या निर्णयाला मोठा विरोध केला होता. मात्र खुद्द शालेय शिक्षण मंत्र्यांनी या शाळा बंद नाही होणार असे स्पष्ट केल्यामुळे या उठणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये.