शिंदेना दिलासा, ठाकरेंना धक्का दसरा; दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा?

शिवाजीपार्कवर दसरा मेळावा शिंदे गटाचा होणार की ठाकरे गटाचा होणार या चर्चांना आता ब्रेक लागला आहे. कारण आता शिंदे गटाला बीकेसीवर मेळावा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गट बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेणार यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाली आहे. बीकेसी मैदानावर शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी मेळावा घेण्याची परवानगी मागितली होती मात्र ठाकरे गटाची मागणी फेटाळून शिंदे गटाला दसरा मेळावा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 

दोन्ही गट शिवाजीपार्कसाठी आग्रही

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क म्हणजेच शिवतिर्थावर होणार की नाही यावर अजुनही प्रश्नचिन्हच आहे. शिवाजी पार्क वरच आम्ही दसरा मेळावा घेणार असे दावे दोन्ही गटांकडून केले जात आहेत. मात्र मुंबई पालिकेने कोणाच्याच अर्जाला अद्याप मंजूरी दिली नाहीये. त्यामुळे दोन्ही गटांकडून पर्यायी व्ययवस्थेची शोधाशोध सुरु झाली. यात बिकेसीच्या एका मैदानाकरता ठाकरे गटाने तर दुस-या  मैदानाकरता शिंदे गटाने एमएमआरडीएकडे दसरा मेळाव्यासाठी अर्ज दाखल केले होते. यात एमएमआरडीए प्ररासनाने ठाकरे गटाचा अर्ज नापास ठरवत एकनाथ शिंदे गटाच्या अर्जाला मात्र पास केले आहे.

ठाकरे गटाची मागणी का फेटाळली?

शिवसेनेच्या कामगार सेनेकडून बीकेसीतील कॅनरा बँकेजवळच्या मैदानासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. पण एका कंपनीकडून याआधीच कार्यक्रमासाठी ग्राऊंड आरक्षित केलेले आहे. त्यामुळे ठाकरेंना परवानगी नाकारली आहे. बीकेसीमध्ये दोन मैदानं आहेत. यातील एमएमआरडीच्या मुख्य मैदानासाठी शिंदे गटाकून अर्ज दाखल करण्यात आला होता. प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य या नियमाअंतर्गत एमएमआरडीएकडून शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.