संजय राठोड यांची आठवण करून देत उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यामधील शाब्दिक वाद चांगलाच रंगलेला दिसत आहे. कालच नाशिक मध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला खडेबोल सुनावले तर दुसरीकडे उर्फी जावेद चित्रा वाघ यांना समाज माध्यमांच्या माध्यमातून सारखी प्रत्युत्तर देताना दिसत आहे. त्यामुळे दोघींमध्ये वाद चांगलाच रंगला आहे. अशात उर्फी जावेदने थेट संजय राठोड प्रकरणाची आठवण करून देत चित्रा वाघ यांना डिवचले आहे (Reminding Sanjay Rathod Urfi teased Chitra Wagh).

काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदने सोशल मीडियावर अंग प्रदर्शन केल्यामुळे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. ‘उर्फी जावेद रुपी होणारा स्त्री देहाचा बाजार रोखा’ अशी मागणी त्यांनी केली. एकीकडे त्यांनी उर्फी जावेदला धारेवर धरले तर दुसरीकडे उर्फी ट्विटरवर त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहे. अशात संजय राठोड यांचं नाव काढत उर्फीनं नुकतंच एक ट्विट केलं आहे आणि चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे.

उर्फी या ट्विटमध्ये म्हणते की ‘तुम्ही भाजप मध्ये प्रवेश केल्यावर संजय राठोड यांच्या सर्व चुका विसरल्या…राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या विरोधात भरपूर हल्ला केला होता..’दरम्यान आता उर्फी जावेदच्या या ट्विटला चित्रा वाघ काय उत्तर देतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. संजय राठोड यांचं नाव घेतल्यानंतर चित्रा वाघ यांच्या उत्तरावर लक्ष लागून आहे.

नाशकात चित्रा वाघ उर्फीवर संतापल्या

काल चित्रा वाघ या नाशिक दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी पत्रकारांशी यावेळी संवाद साधला. दरम्यान त्या अभिनेत्री उर्फी जावेदवर प्रचंड संतापल्या. ‘उघड्या नागड्या फिरणाऱ्या मुली या महाराष्ट्रात चालणार नाही, ही बाई मला ज्यादिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाड रंगवेन असा थेट इशारा त्यांनी दिला होता.

“आम्ही काय काम करतो, हे ऊर्फी सारख्या बाईला मला सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. ज्या पद्धतीने नंगानाच सुरू आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अश्या शब्दांत तिला सुनावले आहे. संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या लोकांना हा नंगानाच दिसत नाही का?” असा सवाल त्यानी यावेळी केला आहे.

मला तर ही उर्फट बाई कोण आहे, हे माहीतही नाही, एका बाईने मला हे व्हिडिओ पाठवले, तिने मला सांगितलं, मुंबईच्या रस्त्यावर काय चाललंय बघा. हा नंगानाच आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही पोलिसांत तक्रार केलीय. याला अंतिम स्वरूप दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला. ‘जे ट्रोलर्स आमच्यावर टीका करत आहे, त्यांना हे मान्य आहे का ? तुम्ही चॅनलवाले बातम्या करताना का ब्लर दाखवता?, कारण तुम्ही ते दाखवू शकत नाही. मग अशा या उघड्या नागड्या फिरणाऱ्या मुली या महाराष्ट्रात चालणार नाही’ असे खडेबोल त्यांनी सुनावले. तर ही बाई मला ज्यादिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाड रंगवेन, आणि नंतर तुम्हाला ट्विट करून सांगेन..काय व्हायचं ते होऊ द्या’ असा संताप त्यांनी व्यक्त केला होता.