रोहित पवार बिनडोक, खुरप्याने डागल्यावर अक्कल येईल; पडळकरांची जहरी टीका

रोहित पवार हे बिनडोक आहेत, त्यांना मेंढराच्या डागनीने डागल तरी ते सुधारणार नाहीत, खुरप्याने डागावे लागेल, मग कुठेतरी त्यांना अक्कल येईल असा घणाघात भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पिंपरी चिंचवड मतदार संघामध्ये अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी गोपीचंद पडळकर आले होते. यावेळी ते बोलत होते. त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. एमपीएससीच्या तरुणांच्या आंदोलनाचे श्रेय पवारांना घ्यायचे असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांना डिवचले होते, ” गोपीचंद पडळकर हे चॉकलेट बॉय असून ते प्रसिद्धीसाठी पवारांवर टीका करतात, त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे म्हणत रोहित पवारांनी त्यांना डिवचले.

त्यावर आता पडळकर पिंपरी चिंचवडमध्ये असताना यांनी रोहित पवारांचा समाचार घेतला आहे, पडळकर म्हणाले, रोहित पवार हे बिनडोक आहेत. त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बोटे घालण्याची सवय आहे. एमपीएससीच्या तरुणांच्या आंदोलनाचे शरद पवार यांना श्रेय घ्यायचे म्हणून ते बैठक घडवून आणत आहेत. प्रत्यक्षात या तरुणांचे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोडवत आहेत असा हल्लाबोल यावेळी पडळकर यांनी केला.

पुढे ते म्हणाले, “रोहित पवारांना मेंढराच्या डागनीने डागल तरी ते सुधारणार नाहीत. खुरप्याने डागावे लागेल. मग कुठेतरी अक्कल येईल,” अशी जहरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. यावर आता आमदार रोहित पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.