बाळासाहेब थोरातांची सत्यजित तांबेंना साद! त्यावर तांबेंचं सूचक ट्वीट..

नाशिक : पदवीधर मतदार संघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी एक सूचक ट्वीट केले आहे. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी अश्या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे. त्यामुळे यावरून त्यांनी काँग्रेस सोडून नवा मार्ग अवलंबणार का? अश्या चर्चाना उधान आले आहे. सोमवारी संगमनेरमध्ये झालेल्या जाहीरसभेत बाळासाहेब थोरात यांनी भाच्याला साद घातली होती, आमच्याशिवाय काही जमणार नाही आणि तुलाही करमणार नाही असे विधान सत्यजित तांबे यांना उद्देशून थोरात यांनी केले होते.

काय आहे सत्यजित तांबे यांचे ट्वीट

‘उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी… नजरेत सदा नवी दिशा असावी । घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही… क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी ।’

हे ट्वीट सत्यजित तांबे यांनी केले आहे. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबे यांना स्वगृही परतण्याचे आव्हान दिले होते. त्यावर सत्यजित तांबे यांनी हे उत्तर दिले असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यामुळे सत्यजित तांबे काय भूमिका घेताय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात?

‘राज्यात भारत जोडो यात्रा आलेली तेव्हा सत्यजीत तांबे यांनी खुप मेहनत घेतली. सत्यजीतची टीम काँग्रेसमध्ये राहिली आहे. पण तो एकटा राहिला आहे. आता तुलाही करमणार नाही, त्यांनाही करमणार नाही आणि काँग्रेसलाही करमणार नाही, तुझा अपक्ष आता किती दिवस टिकते ते पाहू. कारण आमच्याशिवाय काही जमणार नाही आणि तुलाही करमणार नाही,’ असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.