शरद पवार म्हणताय, कोण म्हणतं मी म्हातारा झालो; त्यांच्या कोटीवर हशा, टाळ्यांचा पाऊस

कोण म्हणतं मी म्हातारा झालो. काय पाहिलं तुम्ही? असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टोलेबाजी केली, मिश्कील शैलीमुळे वातावरणात हशा पिकला असून पवारही आपल्या या कोटीवर मनमुराद हसले. शरद पवार आज पुरंदरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी शरद पवार यांनी मनसोक्त टोलेबाजी देखील केली.


शरद पवार यांनी पुरंदर येथे एका शेतकरी कार्यक्रमात सभेपूर्वी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांचे म्हणणे, समस्या ऐकून घेतल्या. यावेळी एका तरुण शेतकऱ्याने पवारांना या वयात बाहेर न फिरण्याची विनंती केली. आमची एक कळकळ आहे. साहेबांनी फिरू नये. एका जागेवरून रिमोट दाबावा. आम्ही जिथे असू तिथून काम करू, असे हा शेतकरी म्हणाला. त्यानंतर झालेल्या सभेत पवारांनी हाच धागा पकडून मिश्किल कोटी केली.


पवार म्हणाले,

“आताच एक आमच्या भावकीतील जेजुरीच्या सहकाऱ्यांनी सांगितले मी आता मी बाहेर फिरू नये. त्यांना वाटतं मी म्हातारा झालो. कुठायत ते? आहेत का? कुणी सांगितलं म्हातारा झालो? तुम्ही काय बघितलं? काय म्हातारा बितारा झालो नाही. ठिक आहे वय वाढतं, अशी मिश्किल टिप्पणी पवार यांनी करताच एकच खसखस पिकली.”

एका शेतकऱ्याच्या समस्येवर पवार म्हणाले, महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी आवश्यक धोरण स्वीकारले जात नाही. राज्यातील नुकसानीबाबत केंद्र आणि राज्य सरकारला माहिती देणार. पुरंदर तालुक्याचे चित्र बदलत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने मी आलो तुम्ही कधी मला मोकळ्या हाताने पाठवले नाही. तुमची साथ प्रत्येक निवडणुकीत लाभली, असे ते म्हणाले.

शेतकऱ्याच्या स्वप्नात पवार

तरुण शेतकरी उभा राहून म्हणाला, मागील दहा वर्षात तुम्ही माझ्या स्वप्नात दोन वेळा आला आहात. आता मी तुम्हाला माझी समस्या सांगतो… असं हा तरुण म्हणत असतानाच पवारांनी त्याला मध्येच थांबवले. त्यानंतर पवारांनी आपल्या खास शैलीत या तरुण शेतकऱ्याची फिरकी घेतली. स्वप्न पहाटे पडलं होतं की मध्यरात्री? असा सवाल करताच उपस्थितांमधून हस्याचा बॉम्बच फुटला. आपल्या या कोटीवर पवारही मनापासून हसले. त्यानंतर पवारांनी त्या तरुण शेतकऱ्याला पुढे बोलण्यास सांगितले.