संजय राउतांच्या पत्राला नाशकातून गिरीश महाजनांचे उत्तर

नाशिक : राज्यात दिवसाढवळ्या खून केले जात आहेत आणि गुन्हेगारांना राजाश्रय मिळतोय असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पत्रकार शशिकांत वारीसे यांचा अपघात नव्हे तर हत्याच आहे असा आरोप संजय राऊत यांनी पत्राद्वारे केला आहे. ‘कोकणातील नाणार रिफायनरी विरुद्ध लोकांमध्ये जागृती करणाऱ्या पत्रकाराची दिवसाढवळ्या हत्या झाली. हे भयंकर आहे. देवेंद्र फडणवीस गृह विभागाचे नेतृत्व करत असताना असे घडावे आणि संबंधित गुन्हेगारांना राजाश्रय मिळावा हे भीषण असल्याची टीका करत राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा देणारे पत्र लिहिले आहे’ या पत्रावरून गिरीश महाजन यांनी रावतांना उत्तर दिले आहे.

‘संजय राऊत यांनी पत्र काढले आहे. गुन्हेगाराला राजाश्रय दिला जातोय असे ते म्हणतात. कालच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फास्ट ट्रकवर प्रकरण हाताळणार असल्याचे म्हटले आहे. मात्र राऊत प्रसिद्धी साठी बोलत आहेत.
त्यांच्या सरकारच्या काळात पत्रकारांचे हाल झालेत. राजाश्रय दिला असता तर त्याला पकडले नसते. राऊत रोज भोंगा वाजवत आहेत. दिवसा ढवळ्या कोणी कायदा सुव्यवस्था मोडत असेल तर त्याला शिक्षा होणार. देवेंद्र फडणवीस यांनी नानार प्रकल्प बाबत बोलावे आणि हत्या व्हावी याचा काही सबंध नाही. राऊत यांनी त्यांच्या काळात काय झाले ते आठवा.’ असे उत्तर महाजानंनी दिले आहे.

राऊत यांचे पत्र

‘राज्याचे गृहमंत्री म्हणून ढासाळणाऱ्या कायदा सुव्यवस्थेकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. आपल्यासारख्या प्रशासनाचा मोठा अनुभव असणाऱ्या नेत्याकडे गृह विभागाचे नेतृत्व असताना राज्यात दिवसाढवळ्या खून पहावेत आणि संबंधित गुन्हेगारांना राजाश्रय मिळावा हे चिंताजनक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील तरुण पत्रकार शशिकांत वारीसे यांची हत्या करण्यात आली. या हत्येला अपघाताचे स्वरूप दिले असले तरी ही हत्याच आहे. पत्रकार वारीसे हे कोकणात येऊ घातलेल्या रिफायनरी विरुद्ध सातत्याने आवाज उठवत होते. त्याबाबत लिखाण करत होते आणि रिफायनरीचे समर्थक म्हणून घेणारे गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांना धमक्या देत होते. रिफायनरीस कोकणातील जनतेचा विरोध आहे. जरी आपले याबाबत वेगळे मत असले तरी स्थानिक रिफायनरी विरुद्ध संघर्ष करत आहे आणि शशिकांत वारीसेसारखे पत्रकार रिफायनरी विरुध्द लोकांना जागृत करत होते. हे सत्य नाकारता येत नाही. वारीशे यांची हत्या ही महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेस कलंक लावणारी घटना आहे’, असे या पत्रात राऊत म्हणाले होते.