शिंदे गटाचे नेते रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले बाप बेटे…

शिंदे गटाचे नेते रामदास कदम हे पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बरसले आहेत. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्षात केवळ तीन वेळा मंत्रालयात आले, कोकणात वादळ आले, अस्मानी संकट आले तेव्हा कोकणवासीयांची अश्रू पुसायला त्यांना वेळ नव्हता. आता बाप बेटे बाहेर पडत आहे अशी टीका शिंदे गटाचे नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

तसेच शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून किती दिवस राज्याला ब्लॅकमेल करणार आहात, असा थेट सावल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांची भावनिक डायलॉ़गबाजी थांबवावी, असा सल्लाही कदम यांनी देत, सत्तेसाठी शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण झाली का, असा प्रश्नही रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे. रामदास कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून एकनाथ शिंदेनी त्यांना नेतेपद बहाल केले होते.

कदमांनी उद्धव ठाकरेंवर आता चांगलाच हल्लाबोल चढवला असून ते म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचे काम कधीच झाले नाही.

स्वत:साठी जगला तो मेला, दुसऱ्यांसाठी जगला तो खऱ्या अर्थाने जगला, असे काम मुख्यमंत्री शिंदे यांचे सुरू आहे. तातडीने निर्णय घेतले जात आहेत. दिवसरात्र काम करत आहेत, मंत्रालयात लोकाना भेटत आहेत. त्यांच्या निवासस्थानी देखील नागरिकांना भेटत आहेत असेही त्यांनी सांगितले. तसेच अजित पवार जेव्हा शिवसेनेच्या आमदारांना संपवत होते तेव्हा आमदारांचे ऐकले असते तर ही वेळ आली नसती, अशी टीकाही कदम यांनी केली.