नाशिक मार्गावरचा शिंदे टोलनाका होणार बंद

नाशिक । प्रतिनिधी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या घोषणेनंतर आता पुणे-नाशिक (Nashik) महामार्गावरील शिंदे टोलनाका (Toll plaza) आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवडे टोलनाका बंद होणार आहे. त्यामुळे वाहन धारकांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गावरील ६० किमीच्या अंतरावर एक टोलचा निर्णय घेतला. येत्या एक ते दोन महिन्यात याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरवडे व पुणे नाशिक महामार्गावरील शिंदे टोलनाका बंद होणार आहे. त्यामुळे वाहन धारकांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.

पुणे-नाशिक महामर्गावर शिंदे गावाजवळील टोलनाका आणि संगमनेरच्या टोलनाक्यात फक्त 52 किलोमीटरचे अंतर आहे, तर पुणे-सोलापूरच्या दरम्यान 60 किलोमीटरच्या आत सावळेश्वर आणि वरवडे हे दोन टोलनाके आहेत. यातील वरवडेचा टोलनाका बंद होणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच शिंदेचा टोलनाका बंद करावा, असा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्गाने पाठवला आहे.

आता गडकरींच्या घोषणेनंतर त्याची येत्या तीन महिन्यांत अंमलबजावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरे तर कमी अंतरावर दोन-दोन टोलनाके असल्याने नागरिकांच्या खिशाला भुर्दंड पडत होता. यावरून अनेकदा वादही निर्माण होत. टोलभरण्यावरून कित्येकदा मारामारीपर्यंतही येथील अनेक प्रकरणे गेली आहेत. दरम्यान, शिंदे टोलनाका बंद करा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनीही केली आहे.