नाशिकमध्ये शिंदेगट ॲक्शन मोडवर ; दिग्गजांच्या उस्थितीत आज बैठक

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळावा घेण्यावर ठाम आहे. तसे आदेश देखील त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याच संदर्भात आज नाशिकमध्ये एकनाथ शिंदे गटाची बैठक होणार आहे. दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. तर खासदार हेमंत गोडसे आमदार सुहास कांदे यांच्यासह महानगर प्रमुख आणि जिल्हाप्रमुख देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुंबईत होणाऱ्या शिंदे गटाच्या दासऱ्या मेळाव्याला नाशिकमधून ताकत देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईला नेण्यासाठीची पूर्वतयारी सुरू आहे.

आज होणाऱ्या बैठकीत या मेळाव्यासंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे. शिंदे गटाची ही तयारी पाहता ठाकरे गटासह शिंदे गटही दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर लक्ष्मी लॉन्स येथे शिंदे गटाची दसरा मेळाव्याबाबती बैठक होणार आहे. मंत्री दादा भुसे खासदार हेमंत गोडसे आणि आमदार सुहास कांदे यांच्यावर नाशिक विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे नाशिकमधून दसरा मेळाव्यात जास्तीत जास्त कार्यकर्ते नेण्यासाठी आणि शिंदे गटाची ताकद दाखवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

मुख्यमंत्री समर्थकांचे मेळाव्यातून शक्तीप्रदर्शन

शिंदे गटाकडून येत्या ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत दसरा मेळावा बोलवण्यात आला आहे. या मेळाव्याच्या तयारीचा भाग म्हणून नाशिकमध्ये बैठकीच्या निमित्ताने शिंदे गटाकडून शक्ती प्रदर्शनाची तयारी केली जात आहे. शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी न्यायालयाने दिल्यानंतर आता शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्यात शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी नाशिकमध्ये समर्थकांची बैठक बोलावण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न काही अंशी यशस्वी ठरल्यानंतर आता प्रत्यक्षात मैदानात उतरण्याची तयारी एकनाथ शिंदे गटाने केली आहे.

शिंदेंसाठी शक्तीप्रदर्शन

खरी शिवसेना कोणाची आणि दसरा मेळावा शिवतीर्थावर कोण घेणार यासाठी दोन्ही गटा गटांमध्ये रस्सीखेच सुरू असताना काल मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा दिला आहे. शिवतीर्थावर उद्धव ठाकरे गटाला रीतसर परवानगी देत न्यायालयाने उद्धव ठाकरेंना दिलासा दिला तर शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. अशात मुंबईच्या बीकेसी संकुलात होणाऱ्या शिंदे गटाचा मेळावा यशस्वी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. नाशिकमध्ये होणारी ही बैठक याचाच एक भाग आहे. शिवतीर्थावर परवानगी मिळाली नसली तरी बाळासाहेबांचा विचार तीच खरी शिवसेना आणि शिवसेनेचा ज्या ठिकाणी दसरा मेळावा तेच शिवतीर्थ अशा प्रतिक्रिया शिंदे गटातून उमटत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंना पाठबळ दिल्यानंतर शिंदेंसाठी शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. तर दसरा मेळाव्यामधून या शक्तिप्रदर्शनाची संधी शिंदे गटाने शोधली आहे.