धक्कादायक..! धबधब्यावर जाणं अंगलट आलं, २५ वर्षीय तरुण गेला वाहून

नाशकात धबधब्यावर जाणे एका तरुणाच्या जीवावर बेतलं असून अचानक वाढलेल्या धबधब्याच्या पाणी प्रवाहात हा तरुण वाहून गेला आहे. ही घटना रविवारी ( दि. ११ ) ची असून युद्धपातळीवर तरुणाचा शोध घेत असून अद्यापही तरुणाचा शोध लागलेला नाही. वाहून गेलेल्या तरुणाचे नाव शुभम चव्हाण असून हा तरुण २५ वर्षाचा आहे. रविवारची सुट्टी असल्याने शुभम आपल्या मित्रांसोबत धबधब्यावर गेला होता. तेव्हाच ही दुर्दैवी घटना घडली.

ढगफुटी सदृश पावसाने नाशकातील पाणी पातळी वाढली

गुरुवारी ( दि. ९ सप्टें. ) रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने नाशकातील सर्व पाणीसाठे तुडुंब भरले असून, गोदावरी नदीलाही मोठा पूर आला आहे. आता काही प्रमाणात पाऊस थांबला असून पाणीपातळी काही अंशी कमी झाली असली तरी पाणी प्रवाह जशास तसा आहे. त्यामुळे अश्या दुर्घटना होत असून नागरिकांनी सतर्क राहायला हवे.

रविवारी नक्की काय घडले?

त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील तोरंगण त्र्यंबकच्या पुढे हेदांबा नावाचा धबधबा आहे. या धबधब्यावर दहा मित्रा गेले होते. रविवारी धबधब्यावर अंघोळीचा आनंद लुटण्यासाठी जाणे तरुणांच्या अंगलट आले आहे. हेदांबा परिसरातील धबधब्याचे पाणी अचानक वाढल्यामुळे दहा मित्रांपैकी एक मुलगा वाहून गेला. त्यामुळे इतर सर्वच मित्र धास्तावले आहेत. हे सर्वजण नाशिक रोड येथील जेलरोड परिसरात राहणार होते.

अद्याप शुभामाचा पत्ता नाही

प्राण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि शुभम वाहून गेला, त्यानंतर शुभमचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनही सुरु करण्यात आले मात्र आज दीड दिवस उलटला अद्याप शुभमचा शोध लागलेला नाही. नाशिकच्या भोसले मिलिटरी स्कूलची रेस्क्यू टीम, पोलीस दल मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक घटनास्थळी दाखल झाले. शुभमचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. शुभम जिवंत सापडावा, अशी अशा केली जातेय.