धक्कादायक..! बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह आढळला भावली धरणात

नाशिक : इगतपुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह आज मंगळवार (दि. १५ ) भावली धरणात आढळून आला आहे. ही महिला मागील २ दिवसांपासून बेपत्ता असून तिची सर्वत्र शोधाशोध सुरु होती मात्र आता तिचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत महिला तालुक्यातील तळोशी येथील रहिवाशी असून संगिता शिवाजी गुंजाळ ( वय ४७ ) असे महिलेचे नाव आहे. महिलेच्या घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत असून घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

घटनेची अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील तळोशी येथील रहिवाशी महिला संगिता शिवाजी गुंजाळ या दोन दिवसापूर्वी मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगून घोटी शहरातून बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा कुठेही पत्ता न लागल्यामुळे इगतपुरी पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आणि त्या बेपत्ता झाल्याच्या दोन दिवसांनी आज मंगळवार (दि.१५) रोजी सकाळच्या सुमारास संगिता गुंजाळ यांचा मृतदेह भावली धरणात आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे. महिलेचा मृतदेह पुढील तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

घातपात?

मृत महिलेचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.