धक्कादायक..! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

परभणीतील सेलू तालुक्यात एक धक्कादायक आणि तेवढीच संतापजनक घटना घडली आहे. एका नराधमाने अल्पवयीन मुलीला बहाणा करत स्वतःच्या घरात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. आरोपीने या आधीही एका अल्पवयीन मुलीसोबत असे कृत्य केले होते. त्या प्रकरणात तो जामिनावर बाहेर आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडली असून नाराधमाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रामेश्वर विष्णू पौळ याने गावातीलच एका अल्पवयीन मुलीला ‘तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. तुला मी चार्जर देतो, ते चार्जर एकास नेऊन दे, असे म्हणून घरात नेले. त्यानंतर आरोपी रामेश्वरने त्याच्या घराचा दरवाजा बंद करून मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर पिडीतेला धमकी देखील देण्यात आली. यानंतर पीडिता घाबरून गेली तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. 

हे ऐकून मुलीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तत्काळ सेलू पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या असून, न्यायालयाने त्याची रवानगी परभणी कारागृहात केली आहे. 

आरोपी बालिकेवर अत्याचारप्रकरणी जामिनावर सुटला

आरोपी रामेश्वर विष्णू पौळ याने 2020 साली तालुक्यातील एका गावातील 9 वर्षीय बालिकेवर अत्याचार केला होता. आरोपीने या निर्णयाविरोधात वकिलामार्फत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. ज्यात जामिनासाठी दिलेला अर्ज दोन महिन्यांपूर्वी मंजूर झाल्याने रामेश्वर पौळ हा गावात आला होता. मात्र त्याने पुन्हा असे संतापजनक कृत्य केले आहे.