धक्कादायक! तरुणाने मावस भावाला व्हीडीओ कॉल केला आणि गळफास घेतला..

पत्नी ६ महिन्यांपासून माहेरी निघून गेल्याने तरुणाने टोकाचे पाऊल उचललं, तरुणाने आपल्या मावसभावाला व्हिडीओ कॉल करत राहत्या घरात गळफास लावून घेतला आहे. ही धक्कादायक घटना औरंगाबादच्या मुकुंदवाडीतील शाहूनगरातील आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून तरुणाच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अमोल उत्तम खाडे (वय. २९) असे मृताचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलीस घटनास्थळी तत्काळ हजर झाले, पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकुंदवाडीतील शाहूनगरातील अमोल खाडे हा रिक्षा चालक होता. अमोल हा भाड्याच्या घरात वास्तव्यास होता. दरम्यान, अमोलचे जवळपास ४ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला अडीच वर्षांची मुलगी होती. मात्र अमोलचे त्याच्या पत्नीचे काही खटके उडाल्याने त्याची पत्नी सहा महिन्यांपासून माहेरी होती.

दरम्यान, अमोल शनिवारी घरी असताना त्याने त्याच्या मावस भावाला व्हीडीओ कॉल केला. आपल्या मावस भावासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असताना अमोल किचन ओट्याजवळ होता. आणि त्याने आपण आत्महत्या करत असल्याचे भावाला सांगितले. त्यामुळे भावाने अमोलला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र अमोलने, तिथे नायलॉनची दोरी लटकवली आणि फास त्याने गळ्यात घातल्याचे व्हिडिओ कॉलमध्ये रेकोर्ड झाले आहे.

अमोलचा मावस भाऊ, नातेवाईक, मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी अमोलला तपासून मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, घटनेचा पंचनामा केला. अमोलने आत्महत्या का केली याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

नातेवाईकांचा आरोप

अमोलच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, पत्नी नांदायला येत नसल्याने अमोलने आत्महत्या केली असावी. तसेच पोलिसांकडून याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.