नाशिक:सिव्हिल हॉस्पिटल नासिक येथील परिस्थिती व्हेंटिलेटवर – आम आदमी पार्टी

नाशिक : महाराष्ट्र सरकार तसेच महानगरपालिकेच्या अत्यारेखेतील जेवढी सरकारी रुग्णालये आहेत आज त्यांची अवस्था बिकट झाली आहे, सुविधांच्या नावाखाली वाणवा आहे,नाशिक महानगरपालिकेच्या ताब्यात असणारे सिव्हिल हॉस्पिटल आज व्हेंटिलेटर वर आले आहे.

मागील दोन दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी चंदन पवार, अमर गांगुर्डे आणि प्रदीप लोखंडे यांनी सिविल हॉस्पिटलचे पितळ उघडे पाडण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केले, त्यात अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत, प्रथमता संपूर्ण हॉस्पिटल हे दुर्गंधी, कचरायुक्त झाले आहे, स्टाईल्स तुटलेल्या आहेत, खिडकीची तावदाने सुस्थितीत नाहीत, सर्व बाथरूम हे अस्वच्छ आहेत, जिकडे तिकडे कपडे अस्ताव्यस्त पडलेले आहेत, बेडवर असणारी बेडशीट अक्षरशा रक्ताचे डाग पडलेले आणि अस्वच्छ आहेत आणि विशेष म्हणजे महिला प्रसूती गृहाची अवस्था तर खूपच भयानक आहे.

तेथे आप पदाधिकाऱ्यांनी भेट दिली असता, व्हिडिओद्वारे चित्रीकरण केले होते त्यात, महिला प्रसूती वार्डमध्ये सर्व महिलांना एकाच वॉर्ड मध्ये गुरांसारखे कोंबलेले होते, हवा येण्यासाठी सुद्धा जागा नव्हती अशी अवस्था बघायला मिळाली, प्रत्येक खाटेला खाट जोडलेली होती, कोरोना वाढत असताना दक्षता म्हणून कुठलेही नियोजन नव्हते, अशा प्रकारे गर्दी करण्यात आलेली होती, प्रत्येक खाटेवर दोन दोन पुरुष बसलेले दिसले, त्यामुळे महिलांना त्यांच्या नवजात शिशुनां वॉर्डांत पुरुष असल्यामुळे स्तनपान करण्यासाठी सुद्धा अडचणीचे होत होते, वॉर्डांत अवेळी पुरुषांना प्रवेश मिळतोच कसा आहे हा मोठा प्रश्न आहे.

तसेच एक महिला आपल्या लहान बाळाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन आली असता, तेव्हा तेथील कर्मचाऱ्याने आम्ही फरशी पुसेपर्यंत थांबा अशी ऑर्डरच दिली आणि ते बाळ सिरीयस होते अशा प्रकारे हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांची पेशंटप्रती असलेली वागणूक आणि हॉस्पिटल जणू कर्मचाऱ्यांनी आपल्या पैशातून उभे केले आहे अशा प्रकारे गैरवागणूक दिली जात होती.

या सर्व असुविधांमध्ये रुग्णालय प्रशासनाचे लवकर बदल करावा, आणि हॉस्पिटल स्वच्छ आणि अद्यावत तसेच कर्मचाऱ्यांचे रुग्णाप्रती वर्तन सुधारावे, या अशा विविध मागण्यांसाठी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी हॉस्पिटलचे डीन डॉ. सुशीलकुमार झा यांची भेट घेवून निवेदन दिले, त्यावर झा यांनी सांगितले की,संपूर्ण व्यवस्था आम्ही पूर्ववत आणि चांगल्या पद्धतीने करू असे आश्वासन डीन यांनी आप च्या शिष्टमंडळाला दिले.

आज दिल्लीमधील हॉस्पिटल बघितली तर उच्च दर्जाची,स्वच्छ, मोफत उपचार, मोफत गोळ्या औषधे तिथे मिळत आहेत, परंतु महाराष्ट्र सरकार या सर्व गोष्टीकडे उदासीनपणे बघते आहे, आरोग्य ही मानवाची मूलभूत गरज आहे आणि तीच व्यवस्था महाराष्ट्र सरकारने कमकुवत ठेवलेली आहे याबद्दल आश्चर्य वाटते आहे, जर निवेदन दिल्यानंतर परिस्थिती सुधारली नाही तर येणाऱ्या काळात आम आदमी पार्टी सिव्हिल हॉस्पिटलच्या गेटवर आंदोलन करेल असा ईशारा हॉस्पिटलचे डीन यांना देण्यात आला आहे.

ह्यावेळी हेल्थ विंग महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. शरद बोडके, युवा आघाडी शहराध्यक्ष अमर गांगुर्डे, प्रसिद्धी प्रमुख चंदन पवार, सहसचिव प्रदीप लोखंडे, महीला आघाडी उपाध्यक्ष मंजुषा जगताप, ज्येष्ठ नेते बाळासाहेब बोडके ईत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.