नाशकात पती-पत्नीची आत्महत्या; धक्कादायक कारणही आल समोर

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित जोडप्याने गळफास घेत आपले आयुष्य संपवले आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. २३ ) रात्री शहरातील एस. टी. कॉलनीच्या भागात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून दोघांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रोहिदास रामा शिंपी व त्यांच्या पत्नी शोभा शिंपी असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. आर्थिक विवंचनेत या पती-पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिकाची माहिती अशी की, सुमारे 30 वर्षांपासून मूळ जळगाव जिल्ह्यातील रोहिदास रामा शिंपी हे कुटुंबीयांसह सिन्नर शहरात वास्तव्यास होते. रोजंदारीवर काम करून आणि नंतर मोलमजुरी करून शिंपी कुटुंबीय उपजीविका करीत होते. त्यांना दोन मुले असून दोन एक औद्योगिक वसाहतीत रोजंदारीवर काम करतो तर दुसरा प्लंबिंग काम करतो.

काही दिवसांपूर्वीच त्यांनी हातउसने पैसे घेऊन घर घेतले होते. हे पैसे परत देऊ शकत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून ते विवंचनेत होते. सोमवारी रात्रीच्या वेळी रात्री अंधार पडूनही घरातील दिवे न लागल्याने परिसरातील नागरिकांनी आवाज दिल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी चौकशी करत घरात डोकावून पहिले असता धक्कादायक चित्र समोर आले.

रोहिदास रामा शिंपी व त्यांच्या पत्नी शोभा यांनी राहत्या घरी भिंतीच्या हुकाला असलेल्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. सिन्नर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर घडलेला प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास आला. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक नवनाथ पवार, सुशील साळवे यांनी पंचनामा केला.