अन गाडी घुंगराची आली! अखेर बैलगाडा शर्यत होणार सुरु

नाशिक । प्रतिनिधी

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बैलगाडा शर्यतीला अखेर हिरवा कंदील मिळाला असून लवकरच बैलगाडा शर्यत सुरु होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

दरम्यान २०१४ पासून बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. तत्कालीन सरकारने याबाबत २०१७ मध्ये कायदा लागू केला होता. परंतु पाठपुराव्या अभावी २०१७-१८ पासून याविषयी कोणतेही ठोस पाऊले उचलली गेली नाही. त्यामुळे शर्यती बंदच होत्या. त्यामुळे अनेक महिने शर्यत सुरु करण्यासंदर्भात अनेक आंदोलने झाली. अखेर आंदोलनाला यश मिळाले असून बैलगाडा शर्यत पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीस अनन्य साधारण महत्व आहे. प्राचीन काळापासून बैलगाडा शर्यतीला विशष मानाचे स्थान असून बैलगाडा प्रेमींसाठी नेहमीच कौतुकाचा विषय ठरला आहे. मात्र २०१७ मध्ये बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली आणि बैलगाडा प्रेमींचा हिरमोड झाला. तेव्हापासून बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी राजकीय नेते, संघटना, बैलगाडा प्रेमींनी शर्यत सुरु करण्यासाठी प्रयत्न केले होते.

मुंबई उच्च न्यायालायाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना बंदी घालण्यात आली होती. दरम्यान गुरुवारी या प्रकरणावर सुनावणी पार पडली. अखेर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी देताना हे प्रकरण आता घटनापीठाकडे दिले आहे. या निर्णयाचे राज्यभर स्वागत केले जात असून बैलगाडा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र काही अटी शर्तींवर या बैलगाडा शर्यती पार पाडाव्यात असे आवाहन हि करण्यात आले आहे.