चारीत्र्याच्या संशयापायी त्याने तिलाही संपवले आणि स्वतःलाही

नाशिक : अंबड परिसरातील चुंचाळे येथे पत्नीची हत्या करून पतीने स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची हत्या करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अंबड चुंचाळे परिसरात राहणारे भुजंग अश्रू तायडे याचे पत्नी मनीषा भुजंग तायडे सोबत वाद झाले होते. या वादातून भुजंगने मनिषावर धारदार शस्त्राने वार करत तिचा निर्घृण खून केला. नंतर त्याने स्वतः घराच्या किचनमधील फॅनच्या हुकला गळफास लावून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला.

अंबड परिसरातील घरकुल योजनेत राहणाऱ्या तायडे कुटुंबातील दोघा पती पत्नीचे मृत देह आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. त्या बाबत सविस्तर असे की, घरकुल योजनेत भाड्याने राहणारे भुजंग तायडे वय (वर्ष ४०) व मनीषा तायडे (वय वर्ष ३८) हे आपल्या दोन मुलांसह या ठिकाणी राहत होते. स्थानिकांच्या माहिती नुसार पती पत्नी घरात एकटेच असल्याने त्यांच्यात भांडण होऊन पतीने पत्नीच्या तोंडाला रुमाल बांधून गळ्याला वार करत हत्या केली. त्यानंतर तात्काळ त्याने पण गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली.

हा सर्व प्रकार बंद दाराआड घडला. त्यानंतर शाळेत गेलेली मुलं घरी येऊन दरवाजा ठोठावत होती. मात्र खूप उशीर झाला तरी दार उघडेना म्हणून मुलाने जोरात दरवाजा ढकलल्याने दरवाजा उघडला. दरवाजा उघडता क्षणी दोघा मुलांना समोर आई वडिलांचे मृतदेह पाहायला मिळाले. मुलांनी सर्व प्रकार बघून शेजारी याची महिती दिली. शेजाऱ्यांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेत घडलेला प्रकार स्थानिक पोलिसांना कळवला. त्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गुन्हे शोध पथकाचे सहायक वसंत खतले यांनी आपल्या टीम सह धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. वरील हत्या व आत्महत्येने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या दोघांचे मोबाईल ताब्यात घेतले असून, या प्रकरणी अंबड पोलीस अधिक तपास करत आहे.

कालच नाशिकच्या सातपूर परिसारत मद्यपी पतीने पत्नीची हत्या करून बनाव केल्याची घटना घडली होती. सातपूर परिसरातील शिवाजीनगर भागात मोलमजुरी करून जगणाऱ्या दांपत्यात झालेल्या वादात मद्यपी पतीने पत्नीची हत्या केली होती. मात्र हत्येनंतर त्याने हा सर्व अपघात असल्याचा बनाव केला. या घटनेला एक दिवस उलटत नाही तोच हत्या आणि आत्महत्येची ही एक घटना आली आहे.