नाशिक । प्रतिनिधी
नाशिककर ज्याची वाट बघतात अशी एक पर्वणी म्हणजे क्रेडाईचे गृह प्रदर्शन ( प्रॉपर्टी एक्स्पो ) हा अडीच वर्षांच्या खंडानंतर येत्या १४ ते १७ एप्रिल दरम्यान शहरातील मध्यवर्ती अश्या डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवि महाजन यांनी दिली. ते आज संपन्न झालेल्या भूमिपूजन समारंभात बोलत होते.
या प्रसंगी राष्ट्रीय क्रेडाईचे सल्लागार (घटना समिती) जितुभाई ठक्कर, राष्ट्रीय क्रेडाईचे कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्र चे सचिव सुनील कोतवाल, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, किरण चव्हाण, नेमीचंद पोतदार, उपाध्यक्ष कृणाल पाटील व मानद सचिव गौरव ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते
दरम्यान भूमिपूजन प्रसंगी अध्यक्ष रवी महाजन म्हणाले की, नाशिक हे देशातील वेगाने विकसित होणारे एक प्रमुख शहर असून उद्योग, हवामान, मुबलक पाणी यामुळे त्यास विशेष पसंती मिळत आहे. त्यातच गेल्या काही कालावधीत नाशिक हे विमान सेवेने अनेक महत्वाच्या शहरांना जोडले गेले असून भविष्यातही अजून शहरे विमानसेवेने नाशिकला जोडली जाणार आहे. समृद्धी महामार्ग, सुरत – चेन्नई एक्स्प्रेस वे, मुंबई – नाशिक महामार्गाचे सहा पदरीकरण, नाशिक – पुणे रेल्वे सेवा यामुळे शहराची कनेक्टीव्हिटी वाढून नाशिक प्रगतीच्या दिशेने अग्रेसर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
क्रेडाई च्या गृह प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक अनिल आहेर म्हणाले की, नाशिकच्या या प्रगतीमुळे अनेकांना नाशिकमध्ये घर, प्लॉट, फॉर्म हाउस , शॉप्स, ऑफिसेस घेण्याची इच्छा आहे. १४ ते १७ एप्रिल दरम्यान होणा-या या प्रदर्शनामध्ये ७० हून अधिक विकासकांचे १० लाखापासून ५ कोटींपर्यंत पर्याय उपलब्ध होणार आहेत. याचशिवाय गृह कर्जासाठी देखील नामवंत वित्तीय संस्था या प्रदर्शनामध्ये सहभागी होणार असल्याने आगामी काळात नाशिकला गुंतवणूक होऊन त्याचा फायदा शहराच्या अर्थकारणास होणार आहे.
बांधकाम उद्योगातील सर्व विकासकांची क्रेडाई हि सर्वात जुनी व विश्वासार्य संस्था असून या प्रदर्शनात फक्त क्रेडाईचे सदस्य असलेल्या विकासकांनाच सहभागी होता येते. त्यामुळे येथील प्रकल्पात ग्राहक निर्धास्तपणे गुंतवणूक करू शकतात. प्रदर्शनाला भेट देणा-यांना सोयीचे व्हावे यासाठी प्रदर्शांतील सर्व डोम्स हे वातानुकुलीत असून प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ८ अशी राहील अशी माहिती सहसमन्वयक मनोज खिंवसरा यांनी दिली.
घर ही माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक असून, घरबांधणीच्या कामात विकासकाची भूमिका महत्त्वाची असते. गेल्या वर्षात अर्थकारण, विविध शासकीय नियम यामध्ये अनेक बदल झाले, तसेच जीएसटी, रेरा सर्व घटकांच्या अनिश्चिततांना आता पूर्णविराम मिळाला आहे. रेरा कायद्यामुळे या व्यवसायात आणखी पारदर्शकता आली असून, सद्य:स्थितीत अर्थसहाय्य संस्थांनीही कर्जाचे दर कमी केले असून, कर्जाचा अवधीही वाढवला आहे. एकूणच सध्या गृह खरेदीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे या प्रदर्शनात गृह खरेदीची महत्त्वाची संधी आहे.