महापालिकेच्या सिटीलिंकने एक महत्वाचा आणि उल्लेखनीय निर्णय घेतला आहे. 40 टक्के किंवा 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या प्रवाश्यांसाठी सिटीलिंक आता मोफत प्रवास उपलब्ध करून देणार आहे. 1 नोव्हेंबरपासून दिव्यांग व्यक्तींना मोफत प्रवास देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा दिव्यांग नागरिकांना होणार आहे. सिटीलिंकच्या या निर्णयाचे सर्वच स्तरांतून स्वागत होत असून त्यांचावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सर्वसामान्य नाशिककरांच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली सिटीलिंक आपल्या प्रवाशांच्या सुखकर, आरामदायी, सुरक्षित प्रवासासाठी नेहमीच प्रवासाभिमुख निर्णय घेत असते. त्यात आता दिव्यांगांसाठी मोफत प्रवास सुरु केल्याने सिटीलिंकचे कौतुक होत आहे. चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या प्रवाशांसाठी मोफत पास योजना लागू राहणार आहे. या दिव्यांगांना सिटीलिंकच्या अधिकृत पास केंद्रावरून सिटीलिंकचा मोफत प्रवासाचा पास काढावा लागेल.
पाससाठी काय करावे लागेल?
ज्या दिव्यांग प्रवाश्यांना मोफत प्रवासाचा लाभ घ्यावयाचा असेन. त्यांनी आवश्यक कागदपत्रांसाहित 14 ऑक्टोबर पासून सिटीलिंक पास केंद्रावरून पास असलेल्या प्रवाश्यांना सिटीलिंकच्या अधिकृत पास केंद्रावरून सिटीलिंकचा मोफत प्रवासाचा पास काढावा लागणार आहे. पास काढण्यासाठी प्रवाशाचा फोटो, रहिवासी पुरावा, आधारकार्ड तसेच 40 टक्के दिव्यांग असल्याचे शासकीय प्रमाणपत्र यांची मुळप्रत तसेच झेरॉक्स कॉपी आवश्यक असेल. तसेच पाससाठी 40 इतके नाममात्र शुल्क आकारले जातील. सदर पास हे केवळ नाशिक महानगरपालिका हद्दीत राहत असलेल्या दिव्यांग प्रवाश्यांनाच काढता येणार आहे. तसेच त्या पासचा वापर 1 नोव्हेंबर पासून करता येणार आहे.