नाशिकमध्ये कोयता गॅंगची दहशत..! टोळक्याने बहिण-भावावर कोयत्याने चढवला हल्ला

नाशिक : एकीकडे पुण्यात कोयता गॅंगचा कहर सुरु असताना आता नाशिकमध्ये देखील कोयत्याचा, धारदार शस्त्रांचा नंगानाच सुरु असल्याच्या घटना समोर येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना नाशिकमधून समोर आली आहे. बहिणीला छेडण्याचा कारण विचारण्यासाठी गेलेल्या बहीण भावावर टोळक्याने कोयत्याने वार केल्याची ही घटना आहे. ही धक्कादायक घटना सिडको भागातील बुरकुले हॉल परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.

या घटनेत हे दोघे बहीण भाऊ जखमी झाले आहे. यात भाऊ उमेश भुजबळ याला हातवर, कंमरेवर आणि डोक्यावर मार लागला आहे. तर बहीण प्रीती हिच्या हातावर कोयत्याचा वार लागत ती देखील जखमी झाली आहे. सध्या या दोघा बहिण भावांवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णायलाय उपचार सुरू आहे. तर या टोळक्यावर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घडलेली घटना अशी की, बहीण प्रीती ही क्लास संपल्यानंतर घरी परतत होती. त्या वेळी काही टवाळखोरसिडको परिसरातील बुरकुले हॉल या ठिकाणी बसले होते. त्यांनी तिला जाताना पाहून अश्लील हाव भाव केले आणि तिची छेड काढली. घरी आल्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेला हा संपूर्ण प्रकार तिच्या भावाला सांगितला.

बहिणीची छेड काढल्यामुळे संतप्त भावाने नाव घेण्याचे कारण विचारण्यासाठी टोळक्याला गाठले. दरम्यान या वेळी बसलेल्या टवळखोरांनी आपल्याजवळ असलेल्या कोयता बाहेर काढला. आणि त्याच्यावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. भावावर वार होताना पाहून बहिण घाबरली तिने या टवाळखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या टवाळखोरांनी तिच्यावर देखील कोयत्याने हल्ला चढवला.

या घटनेत भाऊ आणि बहिण दोघे देखील जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान जखमी मुलीला या सर्व प्रकारचा धक्का बसला असून ती या धक्क्यामधून सावरली नाहीये. त्यामुळे त्या टवाळखोरांवर लवकरात लवकर कारवावी व्हावी आणि त्यांना अटक व्हावी अशी मागणी नातेवाईकांसह दोघा बहिण भावाने केली आहे. यावरून मात्र नाशिक शहरामध्ये किती मोठ्या प्रमाणात गुंडागिरी वाढली आहे हे दिसून येत आहे. शस्त्रांचा सर्रास पाने वापर सुरु आहे त्यामुळे पोलिसांचा धाक गुंडांना राहिला आहे की नाही..? हाच प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.