सटाणा तालुक्यातील घटना कोयत्याने पत्नीवर सपासप वार करून पत्नीला संपवलं

सटाणा (नाशिक तक वृत्तसेवा) – पत्नी आपल्या सोबत बाहेरगावी कामाला येत नसल्याच्या रागातून पतीने पत्नीवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना सटाणा तालुक्यातील देवळाणे गावात घडली आहे. ऊस तोडण्याच्या कोयत्याने पतीने रागाच्या भरात पत्नीवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.

पत्नी ललिता गांगुर्डै ही सध्या माहेरी आईकडे आली होती. आई गीता पगारे हिच्या सोबत शेतमजूरी करुन ललिता या घराकडे येत होत्या. त्याचवेळी पती म्हाळू गोरख गांगुर्डे याने तिला रस्त्यात अडविले. माझ्या सोबत बाहेरगी कामाला का येत नाही याची विचारणा त्याने केली.

तसेच, आपल्या सोबत येण्याचा आग्रह धरला. मात्र त्यास पत्नीने नकार दिला. त्याचा राग म्हाळूला आला. अखेर म्हाळूने हातात असलेल्या कोयत्याने पत्नी ललिताच्या डोक्यावर, हातावर व पाठीवर सपासप वार केले.

या घटनेत पत्नी ललिताचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पती म्हाळू फरार झाला. जायखेडा पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मयताचा मृतदेह नामपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठविला.

तर आरोपी पतीचा शोध घेण्यासाठी पाठविले असता आरोपी म्हाळू एका डाळींबाच्या शेतात लपल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.