ज्या प्राचार्यांना मारहाण केली; त्यांच्यावर संतोष बांगर यांचे गंभीर आरोप..

नेहेमी वादाच्या भोवऱ्यात अडकणारे शिंदे गट आमदार संतोष बांगर हे पुन्हा एकदा यावरून चर्चेत आले आहेत. बांगर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत संतोष बांगर हे एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मारहाण करताना दिसून येत आहेत. यावरून आता राज्यात एकच खळबळ उडली असून बांगर यांच्यावर जोरदार टीका होत आहे. मात्र आता संतोष बांगर यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्या प्राचार्यावरच बांगर यांनी गंभीर आरोप केले आहेत.

यावर बांगर म्हणाले,  त्या प्राचार्याने एका महिलेवरती अन्याय केला आहे. महिलेची अब्रु चव्हाट्यावर येऊ नये म्हणून आम्ही गप्प बसलो. नाहीतर या प्राचार्यावर आम्ही गुन्हा दाखल केला असता, असे संतोष बांगर यांनी आक्रमकपणे म्हटलं आहे.

‘सरकारमध्ये असलं म्हणून आवाज उठवायचा नाही का? आम्ही काय हातात बांगड्या घातल्या आहेत का?, असा सवाल आमदार बांगर यांनी उपस्थित केला आहे. इतकंच नाही तर, महिलेवर अत्याचार होताना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात संतोष बांगर सहन करणार नाही. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी त्याची पर्वा नाही.’

‘सरकारमध्ये असलो म्हणून आवाज उठवायचा नाही, हे आम्हाला सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं नाही.हा प्रकार होऊन ८ दिवस झाले. मात्र, या प्राचार्याने आजवर माझ्या विरुद्ध का तक्रार दिली नाही? सरकार आमचंच, मात्र सरकारमध्ये राहून आवाज उठवावा लागतो, आम्ही काय हातात बांगडया घातल्यात का? असा बांगर यांनी स्पष्ट केले.