मनोरुग्ण बापाला सर्वच कंटाळले; मुलाचे भयंकर कृत्य..!

मुंबईच्या डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांच्या आजारपणाला वैतागलेल्या मुलाने त्यांच्या डोक्यात दगडी जाते टाकत त्यांची निर्घृण हत्या केली आहे. आणि स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. ही धक्कादायक घटना डोंबिवलीच्या खांबाळपाडा भोईरवाडी परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शामसुंदर शिंदे हे खांबाळपाडा भोईरवाडी परिसरात राहत होते. शामसुंदर शिंदे हे दहा वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षक विभागातून सेवानिवृत्त झाले होते, श्यामसुंदर शिंदे हे मनोरुग्ण होते. वडील आजारी असल्याने त्यांच्या आजारपणाचा त्रास घरच्यांना व्हायचा, या त्रासाला कंटाळून मुलगा तेजस शिंदे याने भयंकर कृत्य केले.

बुधवारी संध्याकाळच्या सुमारास श्यामसुंदर हे घरात झोपले असतानाच त्यांचा मुलगा तेजस याने दगडी जाते त्यांच्या डोक्यात घातले. त्यानंतर भाजीच्या सुरीने त्यांच्या गळ्यावर सपासप वार केले यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री होताच तेजसने घरातून पळ काढला आणि तो थेट टिळकनगर पोलीस ठाण्यात गेला. त्याने पोलिसांजवळ गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण आहे. जन्मदात्याचाच मुलाने असा निर्घृण खून केल्याने संताप व्यक्त होत आहे.