खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच; नाशकात रामदास आठवले यांचं भाकीत

खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे असा निकाल निवडणूक आयोग लवकरच देऊ शकते, २/३ आमदार, खासदार शिंदे यांच्याकडे असल्याने शिवसेनेचे धनुष्यबाण शिंदे यांनाच मिळणार अशी भाकीतं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये केली आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी राज्यातील अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे.


त्यांनी विनायक मेटे यांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. नंतर ते नुकताच झालेल्या राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारकडे वळाले आणि आपल्या पक्षाला किमान एक मंत्रिपद मिळावे अशी मागणी मंत्री आठवले यांनी केली आहे. त्यामुळे राज्यात आधीच मंत्रीपदामुळे पेच निर्माण झाला आहे त्यातच रामदास आठवले यांनी केलेल्या या मागणीमुळे आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.


तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे-शिंदे यांच्या वादात उडी घेतली आहे. ते म्हणाले शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, शिंदेंच्या मागे मोठ्या प्रमाणावर नेते आले, फडणवीसांनी मोठे मन करून, आपल्या जास्त जागा असताना देखील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे असा निकाल निवडणूक आयोग लवकर देऊ शकतो, २/३ आमदार आणि खासदार शिंदे यांच्याकडे असल्याने शिवसेना पक्ष चिन्ह एकनाथ शिंदे यांनाच मिळणार आहे. असे भाकीत देखील केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही आठवले यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी मोदी झटत आहेत. घराणेशाही विरोधात पण मोदी काम करत आहेत.