पुन्हा आगीचा थरार..! साईभक्तांच्या वाहनाने घेतला पेट

नाशिक : मनमाड -येवला महामार्गावर अंकाई शिवारात साई भक्तांना घेऊन जाणाऱ्या टाटा मॅजिक गाडीला आग लागल्याची घटना काल (दि. २९) रात्री घडली असून या आगीमध्ये गाडी जळून खाक झाली आहे. मात्र गाडी चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र गाडीतील प्रवाशांचे सामान गाडीतच राहिल्याने हे सामान या आगीत भस्मसात झाले आहे. प्रवासी सुखरूप आहेत.

इंदौर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मनमाड शेजारी असलेल्या अनकाई फाट्याजवळ शिर्डीला जाणाऱ्या साई भक्तांच्या कारने रात्री ८ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. शिर्डीला हे साईभक्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाने रात्री आठ वाजेच्या सुमारास जात असताना वाहनाने अचानक पेट घेतल्याने एकत्र धावपळ उडाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. प्रवासी वाहनातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मात्र त्यांचे सर्व सामान या आगीमध्ये भस्मसात झाले आहे.

Nashik Tak

मनमाड रेल्वे स्थानकातून प्रवासी घेऊन हे प्रवासी वाहन शिर्डी कडे जात होते. मात्र मनमाड येवला रोडवर अनकाई फाट्याजवळ टाटा मॅजिक या प्रवासी गाडीतून धूर निघायला सुरुवात झाला. हे चालकाच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ गाडी थांबवली आणि प्रवासी गाडीच्या खाली उतरले. त्यानंतर गाडीचे निरीक्षण करत असताना गाडीने अचानक पेट घेतला. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. दरम्यान वरील बाजूस ठेवलेले प्रवाशांचे सर्वसामान जळून खाक झाले. आगीची माहिती मिळतात मनमाड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली.

हे सर्व प्रवासी उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. धावत्या गाडीने अचानक पेट कसा घेतला याचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाहीये. मात्र अंदाज येताच गाडी चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. तरी या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे सर्वसामान्य जळून खाक झाले.

दरम्यान वाहनांना आग लागण्याच्या घटना सतत समोर येऊ लागल्या आहेत. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांत चालत्या वाहनांना आग लागल्याचे प्रकार सारखे समोर येत आहे. यामुळे प्रवाशांच्या जीवाला मात्र धोका निर्माण होत आहे. नाशिक वणी रस्त्यावर सोमवारी (दि. २६) रोजी दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान वणी येथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जात असताना भाविकांच्या कारने पेट घेतला होता. दरम्यान अशातच पुन्हा दुसऱ्या एका वाहनाने पेट घेतल्याची ही घटना समोर आली आहे.