ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होणार?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युतीसंदर्भात चर्चा रंगत आहे. आता या युती संदर्भात उद्याचा दिवस महत्त्वपूर्ण असणार आहे. उद्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. मुंबई येथील दादर पूर्व भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दुपारी एक वाजता पत्रकार परिषद होणार असून, या पत्रकार परिषदेत युती संदर्भात महत्त्वाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांच्या युतीची चर्चा रंगली होती मात्र काही दिवसांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे युतीची बोलणी रखडली असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर गंभीर आरोप देखील केले होते. मात्र कालच नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी, ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी तयार असल्यास, आम्ही हार घालू’, असे वक्तव्य केले होते.

तसेच ते म्हणाले होते की, ‘ठाकरे गट आणि आमच्यात लाईन मारण्याचे काम सुरू आहे’, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता उद्या उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर या दोन्ही नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद होणार असून या पत्रकार परिषदेत महत्त्वाची घोषणा होणार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागले आहे.