प्रतिकार केल्यामुळे चोरांचा गोळीबार! एकाचा मृत्यू..

अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. चोरांचा प्रतिकार करताना झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा जीव गेला आहे. ही धक्कादायक घटना शहरातील केडगाव बायपास रोडवर घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवाजी होले असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना नगर पुणे रोडवरील केडगाव बायपास येथे असलेले हॉटेल के नाईटच्या आवारात घडली आहे. गुरुवारी (दि. २३) रात्रीच्या सुमारास शिवाजी होले हे आपला मित्र अरुण शिंदे यांच्यासोबत हॉटेलच्या आवारात मद्य सेवन करत होते. दरम्यान, त्यावेळी अचानक तेथे तीन लोक आले, त्यांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. कोणाला काहीही न कळता, तिघे जण चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून शिवाजी होले आणि अरुण शिंदे यांच्याकडे पैशांची मागणी करू लागले.

मात्र, यावेळी शिवाजी होले यांनी या तिघांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यात झटापट झाली. या झटपटीत शिवाजी होले यांच्यावर त्या चोरांपैकी एकाने बंदुकीतून गोळीबार केला व यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व होत असताना अरुण शिंदे यांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र घडलेला प्रकार पाहून चोरट्यांनी तेथून आधीच धूम ठोकली, रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या चोरट्यांना पकडण्यासाठी विविध पथके तयार करून तपास सुरू केला आहे.