नाशिकची थरारक घटना..! पिस्तुल ताणत तरुणाला लुटले

नाशिक : वाढत्या चोरीच्या घटनांमध्ये नाशिक शहरातून आता एक अजब घटना समोर आली आहे. चोरट्यांनी एका युवकास अडवत त्याच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र युवकाने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्याने त्याच्यावर पिस्तुल ताणत धाक दाखवला आणि पैसे नाही तर त्याच्याकडील लॅपटॉप हिसकावून घेत पळ काढला. शहरातील तपोवन परिसरात ही घटना घडली आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.

घडलेली घटना सविस्तर…

घडलेली घटना अशी की, नाशिकच्या तपोवन परिसरात क्रॉसिंग जवळ एका युवकाला अडवत तिघा भामट्यांनी त्याला पिस्तुलाचा धाक दाखवला. पिस्तूलचा धाक दाखवत तिघा भामट्यांनी त्या युवकाकडून ४० हजार रुपयांचा लॅपटॉप जबरीने हिसकावून नेला. मुकेश भास्कर चित्ते असे या तरुणाचे नाव असून हा प्रकार घ्द्ल्यानान्त्र त्याने पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

मुकेश भास्कर चित्ते या युवकाने जबरी लुटीच्या प्रकरणात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार तो दुचाकीवरून जात असताना अचानक कन्नमवार पुलावरून पल्सर दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी त्याला रस्त्यात अडवलं. त्याच्याकडून पैशांची मागणी केली. त्याच्याजवळ पैसे नसल्याने दोघांनी त्याच्यावर गावठी पिस्तुल रोखत त्याच्याकडे असलेले ४० हजार किमतीचे लॅपटॉप बळजबरीने हिसकावले आणि तेथून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दखल करून घेत तपास केला असता त्यांना मुळचे मध्यप्रदेश येथील असणारे संशयीत मिळून आले. त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, चार मोबाईल आणि दुचाकी असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पंचवटी पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना त्यांना हे संशयित आरोपी संशयास्पदरीत्या दुचाकीवरून जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना हटकल्यानंतर ते पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची झडती घेतली. यावेळी त्यांच्याकडे चोरीचा लॅपटॉप मोबाईल आणि दोन गावठी पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. अवनीश उर्फ आयुष मथुरा केवट आणि दोन विधी संघर्ष बालक असे तिघे मिळून आले असून हे आरोपी संशयित सराईत असल्याची देखील माहिती समोर आलीये. मुंबई तसेच अंबड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध चोरी, जबरी लुट असे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.