त्र्यंबकच्या पोलिसाला १० हजारांची लाच मागणे पडले महागात!

मुंबई । प्रतिनिधी

पोलीस शिपायाने तक्रारदाराच्या भावाविरोधात गुन्हा दाखल प्रकरणात सहकार्य करण्यासाठी त्र्यंबक पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असेलल्या पोलिसाने दहा हजार रुपये लाच मागितली होती. या प्रकरणी ‘एसीबी’च्या पथकाने या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे लाच प्रकरणात त्र्यंबक पोलिसाविरुद्ध झालेली ही तालुक्यातील अलीकडच्या काळातील पहिलीच कारवाई असल्याचे समजते. या कारवाईने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

त्र्यंबक तालुका पोलीस स्टेशनमध्ये अनेक तक्रारी येत असतात. दरम्यान, त्र्यंबक तालुक्यातील वरसविहिर येथील तक्रारदाराच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयात तपासकामात मदत करणार, आरोपीची अटक आणि जामीन मिळण्यासाठी मदत करेल तसेच प्रकरणात सहकार्य करण्यासाठी दहा हजार रुपये लाच रकमेची मागणी केली होती.

मात्र याबाबत तक्रारदाराने ‘एसीबी’कडे तक्रार केली. या प्रकरणी एसीबीच्या पथकाने पडताळणी केल्यानंतर दहा हजार रुपयांची मागणी केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शिपायाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.