दुर्दैवी..! गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला दोघा भावांचा पाण्यात बुडून मृत्यू

नाशिक: गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना घडली. नदीवर पोहोण्यासाठी गेलेल्या २ युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना नाशिकच्या येवला तालुक्यतील भाटगाव शिवारातील असून गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच अशी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भाटगाव शिवारातील अगस्ती नदीवर पोहण्यासाठी गेले होते युवक आणि त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक दिलीप मिटके आणि तुषार देविदास उगले हे दोघे मंगळवारी दुपारी बंधार्‍यात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोघानाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले. यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे, सहाय्यक उपनिरीक्षक किरण सोनवणे, हवालदार सचिन राऊत, मधुकर जेठे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पोलिसांनी गावातील पट्टीच्या पोहणाऱ्या युवकांनी अथक प्रयत्न करून बंदरातून दीपक आणि तुषारचा मृतदेह बाहेर काढला.  

दरम्यान गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या दुर्घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आहे. या घटनेने दोन्ही परिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून भडगाव गावावर देखील शोककळा पसरली आहे. दीपक मिटके हा बारावी अनुत्तीर्ण होता, तर त्याचा आतेभाऊ तुषार उगले हा भाडगाव नजीक असलेल्या बाबुळगाव येथील एस एन डी शिक्षण संस्थेच्या डिप्लोमा महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. तसेच तुषार हा शिक्षणानिमित्त भडगाव येथे आपल्या मामाकडे राहत होता. दीपक आणि तुषारच्या जाण्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.