महापालिका निवडणुका लागणार कधी ? अमित ठाकरे म्हणाले..

नाशिक : युवा नेते अमित ठाकरे नाशिक मध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Nashik Municipal Corporation election) येणार असल्याची चर्चा होती. ते सध्या २ दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. मात्र आता निवडणुकीची तयारी वगैरे नाही, तर पक्ष बांधणीसाठी हा दौरा असल्याचं ते म्हणाले. ‘निवडणूक लागणार कधी ते मला सांगा.. मी एप्रिल ऐकतोय, सप्टेंबर ऐकतोय..तुम्हाला कळाल की मला सांगा मग आव त्यावर बोलू.. आता निवडणुकीची तयारी वगैरे नाही, तर पक्ष बांधणीसाठी हा दौरा आहे’, असं ते म्हणाले आहे.

युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) संघटनासाठी सेनेला नाशिकमध्ये मजबूत करण्यासाठी आणि महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकाबाबत रणनीती आखण्यासाठी दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर असल्याच्या चर्चा होत्या. ते काल (मंगळवार दि. २७ डिसेंबर) नाशिक मध्ये आले असून आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. तेव्हा आपण विद्यार्थी सेनेच्या नियुक्त्यांसाठी आणि पक्ष बांधणीसाठी आलो असल्याचे ते म्हणाले.

‘तसं ही मला नाशिकला यायला आवडतं, मी नाशिकला येण्यासाठी कारणंच शोधत असतो, सगळ्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलवण्या ऐवजी मीच नाशिकला आलो, नाशिकमध्ये उत्साह असतोच..मी मागच्या दौऱ्यातही सगळीकडे फिरलो..सगळ्यांना विद्यार्थी सेनेते काम करण्याची इच्छा आहे’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ठाकरे गटा पाठोपाठ मनसेचे पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. विशेष म्हणजे मनसे नेते अमित ठाकरेंचा नाशिक दौरा सुरू असतानाच मनसेत पडझड झाली आहे. पक्षाचा बडा नेता जिल्ह्यात असतानाही कार्यकर्ते पक्ष सोडत असल्याने मनसेच्या तंबूत खळबळ उडाली आहे. याबद्दल बोलताना ‘पक्षात लॉक येत जात असतात, आमच्याकडे भाजपाच्या १५० जणांनी मुंबईत प्रवेश केला आहे.. राजकारणात हे होत असत..लोक जात असले तरी आमच्याकडे रिप्लेसमेंट रेडी आहे, साहेबांना मानणारा एवढा मोठा वर्ग आहे की एखादे दोन गेले तर काही फरक पडत नाही..एक एक माणसाला ओढून त्यांना काय मिळतंय मला माहित नाही. मात्र आम्हाला त्याचा फरक पडत नाही’ असं अमित ठाकरे म्हणाले.

दरम्यान आपण नाशिकमध्ये जानेवारीत परत येणार असल्याची माहिती देखील अमित ठाकरे यांनी दिली आहे. ‘नाशिकची टीम तयार झाली आहे. कॉलेज लेव्हलला युनीट स्थापन करायचे आहेत..त्याच्या तयारीला लागणार आहे..मनसेची पहिली फेज नक्की परत येणार’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.