‘त्या’ १२ आमदारांची नियुक्ती का रखडली, माजी राज्यपालांनी सांगितले कारण..

भगतसिंग कोश्यारी हे नाव महाराष्ट्राच्या राजकरणात न विसरण्याजोगे आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांचे अनेक निर्णय हे वादग्रस्त राहिलेले आहे. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे 12 आमदारांच्या फाईलवरील सही, त्यांनी मविआच सरकार असताना 12 आमदारांच्या फाईलवरील सही न करण्याचा निर्णय घेतला होता, हा निर्णय का घेतला याबाबत त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून मुक्त झाले आहेत, त्यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यानंतर एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकाळातील अनेक निर्णय आणि घडामोडींवर भाष्य केले आहे. त्यात त्यांनी विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त 12 जागांसाठीच्या फाईलवर स्वाक्षरी न करण्याचा कारण स्पष्ट केले आहे.

राज्यपाल म्हणाले, महाविकास आघाडीची शिष्य मंडळ भवनात येत राहिले. मी त्यांना सांगितलं की, तुम्ही आधी हे पत्र बघा. पाच पानांचे पत्र आहे. ते प्रकरण नंतर सुप्रीम कोर्टात गेले. पाच पानांच्या पत्रात तुम्ही राज्यपालांना धमकी देत आहात. कायदे सांगत आहात. आणि शेवटी लिहिता की, 15 दिवसांत मंजूर करा. कुठे लिहिलंय की, मुख्यमंत्री राज्यपालांना सांगू शकतो की, मला इतक्या दिवसांच्या आत मंजूर करून पाठवा. संविधानात कुठे लिहिलं आहे? असा सवाल त्यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

‘ते पत्र जेव्हा समोर येईल, तेव्हा तुम्हाला कळेल की सत्य काय आहे. तसे पत्र पाठवले नसते, तर मी पुढच्याच दिवशी त्यावर सही करणार होतो. तुम्ही असली पत्र लिहिता. असे ठाकरे सरकारला झापत त्यांनी सही न करण्याच कारण सांगितले.