सावकारांच्या जाचामुळे २ सख्ख्या भावांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक : नाशिकरोड येथील एकलहरे परिसरात सावकाराच्या त्रासाला कंटाळून दोन सख्ख्या भावांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना काल सायंकाळी घडली असून यात एकाचा मृत्यू झाला आहे, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

रवींद्र लक्ष्मण कांबळे व जगन्नाथ लक्ष्मण कांबळे या दोघा भावांनी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यात रविंद्र कांबळे यांचा मृत्यु झाला व जगन्नाथ कांबळे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान संतप्त नागरिकांनी रुग्णालयात गर्दी करत नाशिक पुणे मार्गावर रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केले.

गेल्या काही दिवसांपूर्वी सातपूर परिसरात सावकाराच्या त्रासाला कंटाळून एकाच घरातल्या तीन लोकांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. वडील आणि दोघा मुलांनी एकाच घरातील ३ वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यात पुन्हा एकदा अशीच घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. कर्जबाजारीपणामुळे दोघांनी विष घेतल्याची माहिती आत्महत्या करणाऱ्यांकडे आढळून आलेल्या सुसाईड नोटमध्ये आहे.

शहरातील नाशिकरोड भागात असलेल्या भालेराव मळा येथे राहणारे रवी लक्ष्मण कांबळे आणि जगन्नाथ लक्ष्मण कांबळे यांनी कर्जबाजारीपणा आणि सावकारी जाचाला कंटाळून विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यातील रवी कांबळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर जगन्नाथ कांबळे यांची प्रकृती चिंताजनक आहे. सावकाराने पैशासाठी तगादा लावला असून दोघांना बेदम मारहाण केल्याची देखील माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांकडून रास्ता रोको करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता . त्यामुळे नाशिक पुणे रोड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सावकारावर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आळी आहे.

मिळून आलेल्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे, या संदर्भात अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान एकापाठोपाठ एक सलग दोनदा घडलेल्या या घटनांमुळे पुन्हा एकदा नाशिक शहर हादरून गेले आहे. या आधी देखील खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना नाशिक शहरात घडल्या आहेत. त्यामुळे खाजगी सावकारांवर कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे. यावर आता पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे.